मिर्झापूर : उत्तर प्रदेशच्या सोनभद्र येथे जमिनीच्या वादातून दोन गटांमध्ये उडालेल्या धुमश्चक्रीमध्ये 10 जणांची गोळी मारून हत्या करण्यात आली होती. मृतांच्या कुटुंबियांना भेटायला गेलेल्य़ा काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांना वाराणसीमध्ये पोलिसांनी अडविले होते. यानंतर त्या धरणे आंदोलनाला बसल्या होत्या. अखेर 24 तासांनंतर प्रियंका गांधी यांना काही नातेवाईक भेटले आहेत.
प्रियंका गांधी यांना भेटायला आलेल्या लोकांनी सांगितले की, आमच्या सोबत 15 जण आहेत. मात्र, त्यांना प्रवेशद्वारावरच रोखण्यात येत आहे. प्रशासन आम्हाला येथे येण्यास रोखत असून पीडित कुटुंबियांनाही रोखले आहे. यानंतर प्रियंका गांधी पुन्हा धरणे आंदोलनाला बसल्या आहेत. तेथील गेस्ट हाऊसवर प्रियंका यांनी सांगितले होते की, जर प्रशासन इच्छित असेल तर इतर ठिकाणीही पीडित कुटुंबियांना भेटवू शकते.
जेव्हा या लोकांना ठार करण्यात आले तेव्हा प्रशासनाने त्यांचे रक्षण करायला हवे होते. मदत करायला हवी होती. प्रसारमाध्यमे सरकारवर दबाव टाकण्य़ाऐवजी माझ्यामागे लागली आहेत. पीडितांपैकी दोघे जणच मला येऊन भेटले. अन्य 15 जणांना बाहेरच रोखण्यात आले आहे. सरकारची मानसिकताच लक्षात येत नाहीय. थोडा दबाव बनवा त्यांना आतमध्ये येऊ द्या.
दरम्यान, तृणमूलच्या खासदारांना वाराणसी विमानतळावरच अडविले असून त्यांना 144 कलम लावल्याचे सांगण्यात आले आहे.