सोनिया व राहुलमुळेच झाले नाही कामकाज, संसदीय मंत्र्यांचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 01:32 AM2018-04-06T01:32:20+5:302018-04-06T01:32:20+5:30
संसदीय कामकाज मंत्री अनंत कुमार व काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्यात गुरुवारी लोकसभेत झालेल्या शाब्दिक वादाने सभागृहातील वातावरण तापले होते.
- शीलेश शर्मा
नवी दिल्ली - संसदीय कामकाज मंत्री अनंत कुमार व काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्यात गुरुवारी लोकसभेत झालेल्या शाब्दिक वादाने सभागृहातील वातावरण तापले होते. अनंत कुमार यांनी राहुल व सोनिया गांधी यांनीच कामकाज चालू दिले नाही, असा आरोप करताच सोनिया यांनी आक्षेप घेतला.
त्यांनी सभागृहाबाहेर अनंत कुमार यांच्यावर जोरदार हल्ला केला. सामान्यत: शांत राहणाऱ्या सोनिया गांधी यांनी संसदीय कामकाज मंत्री सभागृहात खोटे बोलू शकतात हे लाजिरवाणे आहे, अशा शब्दांत राग व्यक्त केला. त्या म्हणाल्या, काँग्रेसचे सदस्य आपल्या जागेवर उभे राहून सभागृहात चर्चेची मागणी करीत होते. सरकार आणि त्याचे मित्र पक्ष कामकाज चालू देत नाहीत.
सोनिया गांधी व अनंत कुमार यांच्यात चकमक सुरू असताना काँग्रेसचे सदस्य संतापून उभे ठाकले. वातावरण बिघडल्याचे पाहून सुमित्रा महाजन यांनी राहुल गांधी व सोनिया गांधी यांची नावे कामकाजातून काढून टाकण्याचे आदेश दिले.
भाजपाशी लढण्यासाठी काँग्रेसविरोध सोडणे गरजेचे - पवार
नवी दिल्ली - भारतीय जनता पार्टीशी लढण्यासाठी काँग्रेसविरोध सोडून देणे अत्यावश्यक आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. काँग्रेस आज कमकुवत असला तरी देशाला त्याची गरज आहे. त्याला टाळता येणार नाही. इतर राजकीय पक्षांना देशात ओळख नाही. ती काँग्रेसला आहे, असे पवार म्हणाले.
प्रादेशिक पक्षांच्या शक्तीची जाणीव काँग्रेसनेही ठेवावी आणि त्यांच्याशी बोलणी करताना व्यावहारिक दृष्टीकोन ठेवावा, असे पवारांना वाटत आहे. काँग्रेसच्या सध्याच्या प्रतिकूल परिस्थितीबद्दल विचारले असता पवार म्हणाले की, समाजवादी पक्ष (सप), बहुजन समाज पक्ष (बसप), तृणमूल काँग्रेस (टीएमसी) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (एनसीपी) या पक्षांशी सधन शेतकºयाकडील जमीन गेल्यानंतर जसे उद्धटपणे वागतात, तसे नव्हे, तर त्याच्याकडेही एके काळी जी शेती होती, याची आठवण ठेवून वागावे.
उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस स्वत:ची जागा निर्माण करण्याच्या प्रयत्नांत आहे. उत्तर प्रदेशातील गोरखपूर व फुलपूर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने समाजवादी पक्ष-बहुजन समाज पक्षाच्या संयुक्त उमेदवारांविरुद्ध आपला उमेदवार उभा केला होता.
पवार यांनी मध्यंतरी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, तृणमूलच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी व तेलगू देसमचे अध्यक्ष एन. चंद्राबाबू नायडू यांच्याशी चर्चा केली होती. सर्वांनी एकत्र येण्यासंदर्भात राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा करून योजना कळवतो, असे त्यांनी राहुल गांधी यांना सांगितले होते.