ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ७ - काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहूल गांधी यांना नॅशनल हेराल्ड प्रकरणी दिल्लीमधल्या न्यायालयात उपस्थित रहावे लागण्याची शक्यता आहे. सत्र न्यायालयाने उद्या मंगळवारी सोनिया व रोहूल यांनी कोर्टात हजर रहावे असे समन बजावले आहे. हे समन रद्द करण्यास उच्च न्यायालयाने नकार दर्शवला असून हा काँग्रेसला धक्का असल्याचे मानण्यात येत आहे. नॅशनल हेराल्ड न्यूजपेपरच्या मालकीची कोट्यवधी रुपयांची मालमत्ता सोनिया गांधी व राहूल गांधी यांनी ताब्यात ठेवल्याचा आरोप आहे. तर, या केसमध्ये काही तथ्य नसल्याचे सांगत आम्ही उद्या सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे काँग्रेसचे नेते व वकिल अभिषेक मनू सिंघवी यांनी म्हटले आहे.
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी नॅशनल हेराल्डवर मालकी प्रस्थापित करताना कायदा मोडला आहे, तसेच हजारो कोटींची मालमत्ता काही लाखांत मिळवली असल्याचा याचिकाकर्ते सुब्रमण्यम स्वामींचा आरोप आहे.
काँग्रेसने नॅशनल हेराल्डला बिनव्याजी कर्ज का दिले असे विचारत पैशाची अफरातफर झाल्याचा संशय उच्च न्यायालयानेही व्यक्त केला आहे. स्वामी यांना याप्रकरणी तक्रार करण्याचा अधिकार नसल्याचा काँग्रेसचा युक्तिवाद भ्रष्टाचाराविरोधात कुणीही दाद मागू शकतो असे सांगत न्यायालयाने फेटाळला आहे.
स्वातंत्र्यापूर्वी राष्ट्रभक्तीचा प्रचार व प्रसार करण्यासाठी पंडीत जवाहरलाल नेहरूंनी नॅशनल हेराल्ड हे वृत्तपत्र सुरू केले. गैरव्यवस्थापनामुळे सोनिया गांधींनी २००८मध्ये हे वृत्तपत्र बंद करण्याचा निर्णय घेतला.
सदर वृत्तपत्र राष्ट्रीय विचारसरणीचे होते आणि ते पक्षाच्या धोरणात बसत होते, म्हणून त्यांना ९० लाखांचे कर्ज दिल्याची काँग्रेसची भूमिका आहे. याआधी ज्यावेळी करासंदर्भात नोटिसा दिल्या होत्या त्यावेळी सोनिया गांधींनी ही सूडबुद्धीने करण्यात आलेली कारवाई असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली होती.