नवी दिल्ली - हरियाणातील काँग्रेसच्या व्यासपीठावरच महिला नेत्याशी छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या महिलेचा विनयभंग करण्यात आला. घडलेल्या प्रकारामुळे या महिला नेत्या खूप नाराज झाल्या होत्या. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ३ सप्टेंबरला झालेल्या नरनौद रॅलीत हा प्रकार घडला. ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा रोहतकचे काँग्रेस खासदार दीपेंद्र हुड्डाही स्टेजवर उपस्थित होते.
ज्याठिकाणी महिला नेत्यासोबत छेडछाड झाली ते व्यासपीठ काँग्रेस उमेदवार जस्सी पेटवाड यांच्या प्रचारसभेचं होते. काँग्रेसनं या ठिकाणाहून सैलजा यांचे निकटवर्तीय असलेले अजय चौधरी यांची तिकीट कापून हुड्डा गटाच्या जस्सी पेटवाड यांना उमेदवारी दिली आहे. या घटनेवरून ऑल इंडिया कमिटीच्या महासचिव कुमारी सैलजा यांनी निषेध नोंदवत प्रतिक्रिया दिली आहे. ही घटना निंदनीय असून संबंधितांवर कठोर कारवाई व्हायला हवी अशी मागणी केली आहे.
व्हिडिओत काय दिसतंय?
व्हायरल झालेल्या या व्हिडिओत महिला नेत्या व्यासपीठावर दीपेंद्र हुड्डा यांच्या शेजारी उभ्या होत्या. दीपेंद्र हुड्डा त्यांना घातलेली पगडी काढत होते तेव्हा महिला नेत्या त्यांना नमस्कार करत होती. त्यानंतर दीपेंद्र हुड्डा दुसऱ्या नेत्याशी बोलत होते. त्यावेळी व्यासपीठावरील एक जण महिला नेत्याला आक्षेपार्ह हात लावतो. ती नाराज होत बाजूला बघते तेव्हा दुसरा नेता त्या व्यक्तीला रोखतो. ती महिला नेता सर्वांना शांत राहण्याचा इशारा करते.
या घटनेला काँग्रेस खासदार कुमारी सैलजा यांनीही दुजोरा दिला. मी संबंधित महिला नेत्याशी बोलले, तिने मला तिच्यासोबत घडलेल्या प्रकाराची पुष्टी दिली. जर एखाद्या महिला नेत्यासोबत असे घडत असेल तर ते खूप वाईट आणि निषेधार्ह आहे. यावर कारवाई व्हायला हवी अशी मागणी त्यांनी केली. कुमारी सैलजा या गेल्या काही दिवसांपासून पक्षात नाराज आहेत. १२ दिवस त्या प्रचारापासूनही दूर राहिल्या. त्यांनी त्यांची नाराजी राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यासमोरही जाहीर केली.