मुंबई - राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये (Mahavikas Aghadi Government) काँग्रेसचेआमदार (Congress MLA) नाराज असल्याची चर्चा अनेकदा समोर आली आहे. विशेष म्हणजे काँग्रेसआमदारांनी थेट पक्षाध्यक्ष सोनिया गांधींना भेटीची वेळ मागितली होती. त्यानुसार, दिल्ली दौऱ्यावर असताना मंगळवारी काँग्रेस प्रमुख सोनिया गांधी यांनी महाराष्ट्रातील आमदारांशी जवळपास तासभर चर्चा केली. या भेटीत काँग्रेसच्या आमदारांनी राज्यातील मंत्र्यांची तक्रार केली असल्याची माहिती समोर येत आहे. काँग्रेसचे 22 आमदार या बैठकीला हजर होते, जवळपास एक तासभर त्यांनी पक्षप्रमुखांशी चर्चा केली.
राज्यातील अनेक काँग्रेस आमदारांनी पक्षप्रमुखांपुढे राज्यातील काही मंत्र्यांची तक्रार केली आहे. किमान समान कार्यक्रम ठरला, पण त्यानुसार कामकाज होत नसल्याची तक्रारही आमदारांनी केली. काँग्रेस आमदारांना निधी मिळत नाही. मंत्री फक्त आपल्या मतदार संघासाठी निधी घेतात इतर काँग्रेस आमदारांना वाऱ्यावर सोडतात. त्यावर, किमान समान कार्यक्रमानुसारच कामकाज झालं पाहिजे, अशी तंबीच सोनिय गांधींनी दिल्याचे समजते.
सोनिया गांधींनी सर्वच आमदारांची वैयक्तीक संवाद साधला. राज्यातील विकासनिधी हा सर्वांना समान मिळायला हवा, असा आग्रहही त्यांनी व्यक्त केला. त्यांना भेटून सर्वच आमदारांना आनंद झाल्याचे काँग्रेस नेते सुरेश धोनोरकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. तसेच, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासमवेतही महत्त्वाची बैठक झाल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, सध्या राहुल गांधी विविध राज्यात दौऱ्यावर असून संबंधित राज्यातील काँग्रेस नेत्यांशी ते भेटत आहेत, त्यामुळे त्यांची भेट होऊ शकली नाही. गेल्याच आठवड्यात त्यांनी कर्नाटकचा दौरा केला, त्यावेळी अनेक नेत्यांना आणि आमदार, खासदारांच्या भेटी घेतल्याची माहिती आमदार कुणाला पाटील यांनी दिली. तसेच, महाराष्ट्रात काँग्रेसला बळकटी देण्यासाठी ते पाऊले उचलत आहेत. म्हणूनच, पुढील काही दिवसांतच ते महाराष्ट्र दौऱ्यावर येत असून काँग्रेस आमदार आणि पदाधिकाऱ्यांना भेटणार आहेत.