सोनिया गांधींनीही बोलावली महत्त्वाची बैठक, महाविकास आघाडीवर चर्चा?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2021 03:39 PM2021-06-21T15:39:28+5:302021-06-21T15:40:21+5:30
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी पक्षाच्या सर्वच सरचिटणीस, राज्यांचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्य प्रभारींच बैठक बोलावली आहे. 24 जून रोजी व्हिडिओ कॉन्फरेन्सिंगद्वारे ही बैठक होत आहे.
नवी दिल्ली - शस्त्रक्रियनंतर सक्रिय झालेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सध्या दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवार आणि निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्यात एक महत्त्वाची होत असून शरद पवारांच्या निवासस्थानीच विरोधी पक्षातील १५ ते २० बड्या नेत्यांची बैठक होणार आहे. या भेटीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. त्यातच, आता काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही दिल्लीत काँग्रेस नेत्यांची बैठक बोलावली आहे. त्यामुळे, देशासह राज्याच्या राजकारणात काहीतरी घडणार, अशी चर्चा जोर धरत आहे.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी पक्षाच्या सर्वच सरचिटणीस, राज्यांचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्य प्रभारींच बैठक बोलावली आहे. 24 जून रोजी व्हिडिओ कॉन्फरेन्सिंगद्वारे ही बैठक होत आहे. पंजाब आणि राजस्थानमधील काँग्रेस पक्षातील अंतर्गत कलह, आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका आणि महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमधील सध्याच्या घडामोडींमुळे या बैठकीला अधिक महत्त्व आहे. राजस्थानमध्ये सचिन पायलट आणि मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यातील शीतयुद्ध काँग्रेससाठी डोकेदुखी ठरत आहे.
महाराष्ट्रात काँग्रेसने स्वबळाचा नारा दिल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे काँग्रेसवर टीका केली आहे. त्यातच, शरद पवार यांचा दिल्ली दौराही चर्चेचा विषय ठरला आहे. त्यामुळे, सोनिया गांधींनी बोलाविलेल्या बैठकीकडे काँग्रेससह देशातील प्रमुख पक्षांचे लक्ष लागले आहे.
शरद पवारांच्या उपस्थितीत महत्त्वाच बैठक
शरद पवार यांनी दोन आठवड्यांत दोनदा प्रशांत किशोर यांची भेट घेतली आहे. याआधी मुंबईतील शरद पवारांचं निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवर पवार आणि किशोर यांची भेट झाली होती. आता उद्या पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी विरोधी पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांची बैठक होत आहे. या बैठकीला राष्ट्रीय जनता दल, आम आदमी पक्षासह इतर पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत. तृणमूलचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी राष्ट्रमंच नावानं एक व्यासपीठ सुरू केलं आहे. याच राष्ट्रमंचाच्या बॅनरखाली उद्या शरद पवार आणि विरोधकांची बैठक होत आहे. या नेत्यांच्या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा होईल. यै बैठकीला काँग्रेसचा प्रतिनिधी किंवा नेता उपस्थित राहणार आहे की नाही, याबद्दलची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
यूपीए की तिसरी आघाडी?
शरद पवारांनी काँग्रेसप्रणित यूपीएचं नेतृत्त्व करावं, अशी भूमिका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अनेकदा मांडली आहे. मात्र काँग्रेस याबद्दल फारशी उत्सुक नाही. आता शरद पवारांनी दिल्लीत विरोधकांना एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे पवार तिसरी आघाडी तयार करत आहेत का, अशी चर्चा दिल्लीत सुरू झाली आहे. २०२४ च्या लोकसभेआधी भाजपविरोधात महाआघाडीची गरज असल्याचं विधान काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केलं होतं.