नवी दिल्ली - माजी गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांची भेट घेण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे आज सकाळी तिहार कारागृहात जाणारा आहेत. पी. चिदंबरम हे आयएनएक्स मीडिया घोटाळ्याप्रकरणी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
आयएनएक्स मीडिया घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने अटक केलेले माजी गृहमंत्री आणि काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांच्या न्यायालयीन कोठडीत काही दिवसांपूर्वी ३ ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली होती. आयएनएक्स मीडिया घोटाळ्याप्रकरणी पी. चिदंबरम यांची सीबीआय न्यायालयाने १९ सप्टेंबरपर्यंत तिहार तुरुंगात रवानगी करण्यात आली होती. त्यानंतर 19 सप्टेंबर रोजी विशेष न्यायालयाने पुन्हा चिदंबरम यांच्या न्यायालयीन कोठडीत ३ ऑक्टोबरपर्यंत वाढ केली होती. पी. चिदंबरम यांना तिहार तुरुंगात वेस्टर्न टॉयलेट, टीव्ही, पुस्तकं, चष्मा आणि औषधेही देण्यात आली आहेत. पी. चिदंबरम यांना या सुविधा पुरवण्यासाठी त्यांचे वकील कपिल सिब्बल यांना कोर्टात एक अर्ज दाखल केला होता. त्याला न्यायालयाने मंजुरी देत पी. चिदंबरम यांना तुरुंगात सुरक्षा पुवण्याचे आदेश दिले होते. पी. चिदंबरम यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी २२ ऑगस्ट रोजी ताब्यात घेण्यात आले होते.