नवी दिल्ली :जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरची सुटका कोणी केली ? असा प्रश्न विचारणारे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी सोनिया गांधी व डॉ. मनमोहन सिंह यांनीही मसूद अझहरच्या सुटकेला मान्यता दिली होती, असे उत्तर आपल्या ब्लॉगमधून दिले आहे.कंदाहार विमान अपहरणानंतर मसूद अझहरच्या सुटकेची मागणी केली होती. त्यावेळी तत्कालिन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. त्याला सोनिया गांधी व डॉ. मनमोहन सिंह हेही उपस्थित होते, असे शहा यांनी लिहिले आहे. त्या बैठकीत सर्व राजकीय पक्षांनी मिळून मसूदची सुटका करून अपहृत विमान प्रवाशांना परत आणण्याचा निर्णय घेतल्याचा दावाही केला आहे. तसे करण्याखेरीज अन्य पर्यायच नव्हता, ओलीस ठेवलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी तसे करण्यात आले, असे सांगत त्यांनी मसूदच्या सुटकेच अप्रत्यक्ष समर्थनही केले आहे.तेव्हा पाठिंबा भाजपाचाचरुबिया सईद हिच्या सुटकेसाठी १0 दहशतवाद्यांची जी सुटका करण्यात आल्यचा उल्लेखही अमित शहा यांनी ब्लॉगमध्ये केला आहे. मात्र रुबिया सईदच्या सुटकेशी काँग्रेसचा काहीच संबंध नाही. रुबिया सईद या मुफ्ती महमद सईद यांच्या कन्या आहेत. केंद्रात व्ही. पी. सिंग यांचे सरकार असताना मुफ्नी महमद सईद गृहमंत्री होते. तेव्हाच त्यांच्या मुलीचे अपहरण दहशतवाद्यांनी केले होते. तिच्या सुटकेच्या बदल्यात काही दहशतवाद्यांना सोडण्याचा निर्णय व्ही. पी. सिंग सरकारने घेतला होता. त्या सरकारला भाजपाचा बाहेरून पाठिंबा होता आणि त्या दहशतवाद्यांच्या सुटकेशी काँग्रेसचा अजिबात संबंध नव्हता.
मसूद अझहरच्या सुटकेला सोनिया गांधी, मनमोहन सिंग यांचीही होती मान्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2019 5:35 AM