अभिषेक मनू सिंघवींच्या सावरकरांवरील 'त्या' ट्विटमुळे सोनिया गांधी संतप्त, मागायला लावली माफी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2019 05:49 PM2019-10-22T17:49:49+5:302019-10-22T17:54:30+5:30
स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रशंसा करणे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अभिषेक मनू सिंघवी यांना चांगलेच महागात पडले आहे.
नवी दिल्ली - स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रशंसा करणे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अभिषेक मनू सिंघवी यांना चांगलेच महागात पडले आहे. सोमवारी महाराष्ट्र आणि हरयाणामधील विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू असतानाच अभिषेक मनू सिंघवी यांनी सावरकरांची प्रशंसा करणारे ट्विट केले होते. मात्र या ट्विटमधील आशयामुळे काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी कमालीच्या संतप्त झाल्या. त्यानंतर त्यांनी आपल्या निकटवर्तीयांकरवी सिंघवी यांना संदेश पाठवून फोन करण्यास सांगितले. तसेच या प्रकरणी स्पष्टीकरण मागवून दिलगिरी व्यक्त करण्यास सांगितले.
सोमवारी अभिषेक मनू सिंघवी यांनी एक ट्विट करून सावरकर यांची प्रशंसा केली. ''मी वैयक्तिकरीत्या सावरकरांच्या विचारसणीचे समर्थन करत नाही. मात्र सावरकर हे एक परिपूर्ण व्यक्ती होते. त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला. दलितांना अधिकार मिळवून देण्यासाठी लढाई लढली आणि देशासाठी तुरुंगवासही भोगला. हेही नाकारत नाही.'' असे सिंघवी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते.
I personally don't subscribe to Savarkar's ideology but that doesn't take away the fact that he was an accomplished man who played part in our freedom struggle, flights for Dalit rights and went to jail for the country. #NeverForget
— Abhishek Singhvi (@DrAMSinghvi) October 21, 2019
दरम्यान, अभिषेक मनू सिंघवी यांच्या ट्विटमुळे काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली. स्पष्टीकरण देण्यासाठी सिंघवींवर दबाव वाढवण्यात आला. त्यामुळे अखेरीस सिंघवी यांना प्रसारमाध्यमांवर येऊन माफी मागावी लागली. सिंघवी यांनी सावरकरांवर केलेल्या वक्तव्यानंतर काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने सिंघवी यांना फोन केला. हा फोन काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या सांगण्यावरून करण्यात आल्याचा दावा, इंडिया टुडेने सूत्रांच्या हवाल्याने केला होता.
दरम्यान, सिंघवी यांनी सोमवारी अजून एक ट्विट केले होते. त्यातून त्यांनी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. ''सर्वसमावेशकता ही भारताच्या विचारसरणीची शक्ती आहे. देशाच्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये अनेक प्रवाह राहिले आहेत. मात्र सावरकरांच्या राष्ट्रवादामध्ये अपेक्षित असलेला युद्धोन्माद आणि हिंसक विचारांशी कुणीही सहमत होऊ शकत नाहीत. तसेच त्यांच्या गांधीविरोधी विचारांशीही कुणी सहमत होऊ शकत नाही. मात्र ते राष्ट्रवादी विचारांनी प्रेरित झालेले होते, असे आपण म्हणू शकतो.''
The strength of Indian thinking has been inclusive. Many strands of the freedom movement have existed—one cnot agree with the jingoism or violent elements of #Savarkar’s nationalism nor with his vicious anti #Gandhism but one can accept that he was imbued by nationalist motives.
— Abhishek Singhvi (@DrAMSinghvi) October 21, 2019