नवी दिल्ली - स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रशंसा करणे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अभिषेक मनू सिंघवी यांना चांगलेच महागात पडले आहे. सोमवारी महाराष्ट्र आणि हरयाणामधील विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू असतानाच अभिषेक मनू सिंघवी यांनी सावरकरांची प्रशंसा करणारे ट्विट केले होते. मात्र या ट्विटमधील आशयामुळे काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी कमालीच्या संतप्त झाल्या. त्यानंतर त्यांनी आपल्या निकटवर्तीयांकरवी सिंघवी यांना संदेश पाठवून फोन करण्यास सांगितले. तसेच या प्रकरणी स्पष्टीकरण मागवून दिलगिरी व्यक्त करण्यास सांगितले. सोमवारी अभिषेक मनू सिंघवी यांनी एक ट्विट करून सावरकर यांची प्रशंसा केली. ''मी वैयक्तिकरीत्या सावरकरांच्या विचारसणीचे समर्थन करत नाही. मात्र सावरकर हे एक परिपूर्ण व्यक्ती होते. त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला. दलितांना अधिकार मिळवून देण्यासाठी लढाई लढली आणि देशासाठी तुरुंगवासही भोगला. हेही नाकारत नाही.'' असे सिंघवी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते.
अभिषेक मनू सिंघवींच्या सावरकरांवरील 'त्या' ट्विटमुळे सोनिया गांधी संतप्त, मागायला लावली माफी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2019 5:49 PM