... परंतु एकत्र येऊन काम करण्याशिवाय सर्वांसमोर कोणताच पर्याय नाही; सोनिया गांधी यांचं वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2021 10:29 PM2021-08-20T22:29:19+5:302021-08-20T22:36:26+5:30
Congress President Sonia Gandhi : सोनिया गांधी यांची विरोधी १९ पक्षांच्या नेत्यांसोबत पार पडली बैठक. पुढील लोकसभा निवडणुकीसाठी एकत्र येण्याचं केलं आवाहन.
काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी शुक्रवारी विरोधी पक्षांना २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी एकत्र येण्याचे आवाहन केलं. "देशाच्या घटनात्मक तरतुदी आणि स्वातंत्र्य चळवळीच्या मूल्यांवर विश्वास ठेवणारं सरकार स्थापन करण्यासाठी विरोधकांना आपल्या समस्या दूर करून एकत्र येत सरकार स्थापन करण्याची गरज आहे," असं सोनिया गांधी यावेळी म्हणाल्या. यावेळी विरोधी पक्षांची एकजूट ही राष्ट्रीय हिताची गरज आहे आणि काँग्रेस आपल्या बाजूनं कोणतीही कसर सोडणार नसल्याचं त्या म्हणाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देशाच्या लोकशाहीच्या तत्त्वांना वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे," असं आवाहन केलं.
सोनिया गांधी यांनी १९ विरोधी पक्षांच्या नेत्यांसह व्हर्च्युअल पद्धतीनं संवाद साधला. तसंच यावेळी त्यांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात (Monsoon Session) विरोधकांच्या एकजुटीवरही भाष्य केलं. "मला खात्री आहे की विरोधकांची ही एकजूट संसदेच्या पुढील सत्रांमध्येही कायम राहील. परंतु व्यापक राजकीय लढाई संसदेबाहेर लढावी लागेल. अर्थातच आपलं लक्ष्य २०२४ च्या लोकसभा निवडणुका आहेत. देशाला स्वातंत्र्य चळवळीच्या मूल्यांवर आणि संविधानाच्या तत्त्वांवर आणि तरतुदींवर विश्वास ठेवणारे सरकार देण्याच्या उद्देशाने आपल्याला पद्धतशीरपणे नियोजन सुरू करावे लागेल," असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
The 19 parties that took part in today's online meeting will jointly organize protest actions all over the country from 20th to 30th September 2021:Opposition statement after the meeting pic.twitter.com/EQs4bJlTKZ
— ANI (@ANI) August 20, 2021
दुसरा पर्याय नाही
सोनिया गांधी यांनी यावेळी विरोधकांना आवाहनही केलं. "'हे एक आव्हान आहे, पण एकत्र आपण त्यावर मात करू शकतो, कारण एकत्र काम करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आपल्या सर्वांच्या काही समस्या आहेत. पण आता राष्ट्रीय हितासाठी यापासून बाहेर येण्याची वेळ आली आहे," असंही त्या म्हणाल्या.
दरम्यान, बैठकीनंतर शरद पवार यांनीदेखील ट्वीट करत बैठकी संदर्भातील माहिती दिली. "सोनिया गांधी यांच्या पुढाकारानं विरोधी पक्षांची बैठक पार पडली. व्हर्च्युअल पद्धतीनं पार पडलेल्या बैठकीत सहभागी होऊन आपले विचार व्यक्त केले," असं ते म्हणाले.
श्रीमती सोनिया गांधी जी की पहल पर आज समान विचारधारा वाले विपक्षी दलों की बैठक संपन्न हुई। वर्चुअली आयोजित की गई इस बैठक में सम्मिलित होकर अपने विचार व्यक्त किए। @INCIndia@NCPspeaks#OppositionMeetpic.twitter.com/P23gtbqWsD
— Sharad Pawar (@PawarSpeaks) August 20, 2021
विद्यमान सरकार मुद्द्यांवर तोडगा काढण्यास अपयशी
"विद्यमान सरकार या सर्व मुद्द्यांवर तोडगा काढण्यास अपयशी ठरलं आहे. जे लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेवर विश्वास करतात, ज्या लोकांना लोकशाहीच्या मूल्यांचा बचाव करण्यासाठी एकत्र काम करायचं आहे, त्यांनी एकत्र यावं असं माझं आव्हान आहे. एक सूचीबद्ध कार्यक्रम सामूहिकरित्या सुरू करण्याची गरज आहे. सर्व मुद्द्यांवर एकत्र तोडगा काढण्याशिवाय आपल्याला कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यायला हवं हे ठरवलं पाहिजे. आपल्या देशाला एक चांगला वर्तमान आणि भविष्य देण्यासाठी काम केल पाहिजे," असं शरद पवार यावेळी म्हणाले. दरम्यान, या बैठकीत समाजवादी पक्षाकडून कोणताही नेता सहभागी झाला नव्हता.