काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी शुक्रवारी विरोधी पक्षांना २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी एकत्र येण्याचे आवाहन केलं. "देशाच्या घटनात्मक तरतुदी आणि स्वातंत्र्य चळवळीच्या मूल्यांवर विश्वास ठेवणारं सरकार स्थापन करण्यासाठी विरोधकांना आपल्या समस्या दूर करून एकत्र येत सरकार स्थापन करण्याची गरज आहे," असं सोनिया गांधी यावेळी म्हणाल्या. यावेळी विरोधी पक्षांची एकजूट ही राष्ट्रीय हिताची गरज आहे आणि काँग्रेस आपल्या बाजूनं कोणतीही कसर सोडणार नसल्याचं त्या म्हणाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देशाच्या लोकशाहीच्या तत्त्वांना वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे," असं आवाहन केलं.
सोनिया गांधी यांनी १९ विरोधी पक्षांच्या नेत्यांसह व्हर्च्युअल पद्धतीनं संवाद साधला. तसंच यावेळी त्यांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात (Monsoon Session) विरोधकांच्या एकजुटीवरही भाष्य केलं. "मला खात्री आहे की विरोधकांची ही एकजूट संसदेच्या पुढील सत्रांमध्येही कायम राहील. परंतु व्यापक राजकीय लढाई संसदेबाहेर लढावी लागेल. अर्थातच आपलं लक्ष्य २०२४ च्या लोकसभा निवडणुका आहेत. देशाला स्वातंत्र्य चळवळीच्या मूल्यांवर आणि संविधानाच्या तत्त्वांवर आणि तरतुदींवर विश्वास ठेवणारे सरकार देण्याच्या उद्देशाने आपल्याला पद्धतशीरपणे नियोजन सुरू करावे लागेल," असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
दरम्यान, बैठकीनंतर शरद पवार यांनीदेखील ट्वीट करत बैठकी संदर्भातील माहिती दिली. "सोनिया गांधी यांच्या पुढाकारानं विरोधी पक्षांची बैठक पार पडली. व्हर्च्युअल पद्धतीनं पार पडलेल्या बैठकीत सहभागी होऊन आपले विचार व्यक्त केले," असं ते म्हणाले.