नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी 5 राज्यांतील विधानसभा निवडणुकीनंतरच्या परिस्थितीचे आकलन करण्यासाठी आणि निवडणूक पराभवानंतर संघटनात्मक बदल सुचवण्यासाठी पाच वरिष्ठ नेत्यांची नियुक्ती केली आहे.
जयराम रमेश यांच्याकडे मणिपूर आणि अजय माकन यांना पंजाबमधील परिस्थितीचे आकलन करण्याचे काम सोपवण्यात आले आहे. तर राज्यसभा खासदार रजनी पाटील यांना गोव्यातील परिस्थितीचे आकलन करण्यास सांगितले आहे. याशिवाय, काँग्रेस नेते जितेंद्र सिंह उत्तर प्रदेशातील निवडणुकीनंतरच्या परिस्थितीचे मूल्यांकन करतील. तसेच, अविनाश पांडे यांना उत्तराखंडमधील परिस्थितीचे आकलन करण्याचे काम सोपवण्यात आले आहे.
काँग्रेसने बुधवारी जारी केलेल्या एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी निवडणुकीनंतरच्या परिस्थितीचे आकलन करण्यासाठी पाच नेत्यांची नियुक्ती केली आहे. तसेच, उमेदवारांकडून आणि महत्त्वाच्या नेत्यांना राज्यांमध्ये संघटनात्मक बदल करण्यासाठी सूचना मागवण्यात आल्या आहेत.
काँग्रेसचा दारूण पराभवदरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाला. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या भाजपशासित राज्यांपैकी एकही राज्य काँग्रेसला जिंकता आले नाही, तर पंजाबमध्ये आम आदमी पार्टीने पराभव केल्यामुळे येथील सत्ता गमावली आहे. यापूर्वी 15 मार्च रोजी सोनिया गांधी यांनी उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूरमधील काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना राजीनामे देण्यास सांगितले होते.