नवी दिल्ली - भारतातही कोरोनाग्रस्तांचा आकडा सातत्याने वाढत आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी देश सज्ज झाला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला. भारतात कोरोनाचा धोका वाढत असून देशातील कोरोना रुग्णांची संख्या चार लाखांवर पोहोचली आहे. तर दुसरीकडे भारत आणि चीन यांच्यामधील तणाव वाढत आहे. भारतीय सीमेवरील गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांच्या हल्ल्यात भारताचे 20 जवान शहीद झाले. यावरून काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधत हल्लाबोल केला आहे.
सोनिया गांधी यांनी देशावर आलेल्या संकटासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकार जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. त्यांची चुकीची धोरणं आणि भोंगळ कारभार सीमांवरील समस्यांचं मूळ असल्याची टीका सोनिया गांधी यांनी केली आहे. आज काँग्रेस कार्यकारिणी समितीची एक बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये सोनिया गांधी यांनी असं म्हटलं आहे. राहुल गांधींसह काँग्रेसचे अनेक नेते या बैठकीला उपस्थित होते.
"देश आज आर्थिक संकट आणि महामारीचा सामना करत आहे. यादरम्यान भारत-चीन सीमेवर झालेल्या चकमकीमुळे देशात तणाव आहे. या दोन्ही संकटांसाठी एनडीए सरकारचे चुकीचे निर्णय आणि धोरणं कारणीभूत आहेत" असं सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे. तसेच इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. सातत्याने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होत आहे. इंधन दरवाढ सुरू असल्यावरून देखील सोनिया गांधी यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं. सरकार पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढवून लोकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम करत असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने जून महिन्यापर्यंत मोफत धान्य देण्याची घोषणा केली होती. मात्र, ही मोफत धान्य योजना आणखी तीन महिन्यांसाठी वाढवावी, असे सोनिया गांधींनीपंतप्रधानांन लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. सोनिया गांधी म्हणाल्या, राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत एप्रिल ते जून या काळात प्रती व्यक्ती 5 किलो अतिरिक्त मोफत धान्य देण्याचा निर्णय प्रशंसनीय आहे. मात्र, लॉकडाऊन आणि त्याचा होणारा परिणाम, या पार्श्वभूमीवर आपण सरकारला काही सुचवू इच्छितो. लॉकडाउनचा मोठा फटका सर्वसामान्य नागरिक आणि स्थलांतरीत मजुरांना बसला आहे. तर, अद्याप कित्येक गरिबांना या मोफत धान्य योजनेचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे, मोफत धान्य पुरवठा योजना आणखी तीन महिने वाढवून, गरिबांना सप्टेंबर महिन्यापर्यंत मोफत धान्य दिले जावे, अशी मागणी सोनिया गांधींनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
लॉकडाऊनमध्ये वर्क फ्रॉम होम महागात पडणार; 'या' लोकांना जास्त Income Tax द्यावा लागणार
Cyber Attack : बँक अलर्ट! SBI मध्ये अकाऊंट आहे?; मग अजिबात करू नका 'ही' चूक, वेळीच व्हा सावध
CoronaVirus News : काय सांगता? 'या' रुग्णालयात कोरोनाग्रस्तांसाठी TikTok थेरपी; डॉक्टरच देतात चॅलेंज
CoronaVirus News : पतंजलीचं पहिलं कोरोना आयुर्वेदिक औषध तयार! रामदेव बाबा आज करणार लाँच
CoronaVirus News : आशेचा किरण! कोरोना हरणार, देश जिंकणार; 'ही' तीन औषधं व्हायरसला टक्कर देणार