नवी दिल्ली : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी कोणत्या मतदार संघातून निवडणूक लढवणार? या प्रश्नावर गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या चर्चेला आज पूर्णविराम मिळाला आहे.
काँग्रेसकडून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी 15 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये राहुल गांधी अमेठी मतदार संघातून निवडणूक लढवणार आहेत. तर सोनिया गांधी रायबरेलीतून निवडणूक लढवणार आहेत.
काँग्रेसकडून जाहीर करण्यात आलेल्या 15 उमेदवारांच्या यादीत गुजरातच्या चार आणि उत्तर प्रदेशच्या 11 जागांचा समावेश आहे. सलमान खुर्शीद हे फरुखाबादमधून निवडणूक लढवणार आहेत.
दरम्यान, रायबरेली आणि अमेठी हे मतदारसंघ नेहमीच काँग्रेसचे गड मानले गेले आहेत. राहुल गांधी यांनी 2014 ची लोकसभा निवडणूक अमेठी या त्यांच्या बालेकिल्ल्यातून लढविली होती. मात्र तेथे भाजपाच्या स्मृती इराणी यांनी त्यांना चांगलीच टक्कर दिली होती.
दुसरीकडे, आगामी लोकसभा निवडणूक सोनिया गांधी कदाचित लढवणार नाहीत, असे सांगितले जात होते. मात्र, त्यांनी पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.
याचबरोबर, गेल्या काही दिवसांपूर्वी सक्रिय राजकारणात उतरलेल्या प्रियंका गांधी यांचे या पहिल्या यादीत नाव नाही आहे. त्यामुळे प्रियंका गांधी निवडणूक लढणार की नाही, याबाबत चर्चा सुरु आहे.