नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi Covid-19 Positive) अजूनही कोरोना संक्रमित आहेत. त्यांचा कोरोना रिपोर्ट पुन्हा पॉझिटिव्ह आला आहे. याबाबतची माहिती सूत्रांनी दिली. निर्धारित वेळेनंतर पुन्हा एकदा त्यांची कोरोना टेस्ट केली जाईल, मात्र तोपर्यंत त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. तसेच, कोरोनामुळे सोनिया गांधी यांनी नॅशनल हेराल्ड प्रकरणी चौकशीसाठी अंमलबजावणी संचालनालयाकडे तीन आठवड्यांचा वेळ मागितला आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यावर डॉक्टरांनी सोनिया गांधी यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणी चौकशीसाठी मिळालेल्या अंमलबजावणी संचालनालयाच्या नोटीसवर सोनिया गांधी यांनी तीन आठवड्यांचा वेळ मागितला आहे. मात्र, अंमलबजावणी संचालनालयाने यावर अद्याप कोणतेही उत्तर दिलेले नाही. बुधवारी नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेसने सांगितले की, सोनिया गांधी आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी अंमलबजावणी संचालनालयासमोर हजर होतील, कारण त्यांच्याकडे लपवण्यासारखे काहीही नाही. पक्षाचे प्रवक्ते पवन खेडा म्हणाले, आम्ही नियमांचे पालन करतो. आमच्या अध्यक्षांना बोलावले तर त्या नक्कीच हजर होतील. आम्हाला कसलीही भीती आणि दहशत नाही, आम्ही भाजपसारखे नाही.
दुसरीकडे, 13 जून रोजी राहुल गांधी अंमलबजावणी संचालनालयासमोर हजर होणार आहेत. यासंदर्भात पक्षाने जोरदार शक्तीप्रदर्शनाची तयारी केली असून पक्षाच्या खासदारांना दिल्लीत बोलावण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसने आपल्या खासदारांना 13 जून रोजी सकाळी दिल्लीत उपस्थित राहण्यास सांगितले आहे. राहुल गांधी यांच्या ईडीसमोर हजेरी लावण्यासाठी पक्षाचे वरिष्ठ नेते, खासदार आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, नॅशनल हेराल्ड प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना नोटीस पाठवून मनी लाँड्रिंगच्या आरोपांवर चौकशीसाठी बोलावले आहे.