Sonia Gandhi ED Enquiry: काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडी चौकशीसाठी आज बोलवण्यात आले होते. सुमारे २ तास त्यांची चौकशी झाल्यानंतर त्यांना प्रकृतीच्या कारणास्तव कार्यालयातून बाहेर सोडण्यात आले. या कारवाईचा निषेध करत काँग्रेसचे कार्यकर्ते देशभर रस्त्यावर उतरले आहेत. अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी आंदोलन केले असून त्याचा फटका वाहतूकीला बसल्याचे दिसले. दिल्ली पासून उत्तर प्रदेश पर्यंत सर्वच ठिकाणी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त केली. कार्यकर्त्यांकडून अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठिकठिकाणी प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सोनिया गांधी आजची चौकशी संपवून बाहेर पडल्यानंतर यूपी काँग्रेसने पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला.
भाजपाशासित राज्य वगळता इतर राज्यांमध्ये केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून विरोधी पक्ष संपवण्याचे काम पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपाचे केंद्रातील सरकार करत असल्याची टीका सातत्याने केली जात आहे. राहुल गांधी यांनादेखील नॅशनल हेराल्ड प्रकरणात ५ दिवस चौकशीला बोलावण्यात आले होते. त्यावेळीही काँग्रेस आक्रमक झाल्याचे दिसले होते. त्यानंतर आज सोनिया गांधी यांना जेव्हा चौकशीनंतर कार्यालयातून बाहेर पाठवण्यात आले. त्यानंतर युपी काँग्रेसने ट्वीट केले. "ज्या खुर्चीसाठी तुम्ही ED च्या माध्यमातून षडयंत्र रचत आहात, ती खूर्ची सोनिया गांधी यांनी ३-३ वेळा नाकारली आहे", असं अतिशय सूचक ट्वीट करण्यात आले आहे. याचा अर्थ, काँग्रेसचे केंद्रात सरकार असताना सोनिया गांधी यांच्याकडे ३ वेळा पंतप्रधान म्हणून संधी आली होती पण त्यांनी ती संधी स्वीकारली नाही.
दरम्यान, राहुल गांधी यांनी सोनिया यांच्या चौकशीआधी अतिशय तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केला. "आज जाहीरपणे देशातील जनतेचा आवाज दाबला जातोय. अहंकार आणि हुकूमशाहीवर सत्याचा नक्कीच विजय होईल" असं राहुल गांधी म्हणाले. "जीएसटीवर चर्चा करा - सभागृह तहकूब, महागाईवर चर्चा - सभागृह तहकूब, अग्निपथवर चर्चा करा - सभागृह तहकूब, एजन्सींच्या गैरवापरावर चर्चा - सभागृह तहकूब. आज जाहीरपणे देशातील जनतेचा आवाज दाबला जात आहे. या अहंकार आणि हुकूमशाहीवर 'सत्या'चा विजय होईल", अशा शब्दांत राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमधून भाजपावर टीका केली.