नवी दिल्ली - काँग्रेसच्या माजी अध्यक्ष आणि युपीएच्या प्रमुख सोनिया गांधी यांनी लोकसभा निवडणुकीनंतर आपल्या लोकसभा मतदार संघात प्रथमच जाहीर सभा घेतली. या सभेत सोनिया गांधी यांनी सत्ताधारी भाजप सरकारवर कडाडून टीका केली.
यावेळी सोनिया गांधी यांनी भाजपवर जोरदार टीका केली. सत्तेत राहण्यासाठी आणि नरेंद्र मोदींना सत्तेवर ठेवण्यासाठी भाजपकडून लोकसभा निवडणुकीत सर्वच मर्यादा ओलांडण्यात आल्याचा, आरोप सोनिया यांनी केला. यावेळी सोनिया यांचा सर्वाधिक रोख निवडणूक प्रक्रियेवर होता. २०१९ लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपने २०१४ पेक्षा अधिक जागा मिळवल्या आहेत. भाजपने स्वबळावर ३००चा आकडा पार केला. तर काँग्रेसला देशात ५३ जागांवर विजय मिळविण्यात यश आले. तर १८ राज्य आणि केंद्रशासित राज्यांमध्ये काँग्रेसला खातं देखील उघडता आलं नाही.
देशात सत्ता कायम ठेवण्यासाठी सर्व मर्यादा ओलांडणे दुर्दैवीच असल्याचे सांगत त्यांनी निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मागील काही वर्षांत देशातील निवडणूक प्रक्रियेवर अनेकदा संशय निर्माण झाल्याचे सोनिया यांनी नमूद केले. सोनिया गांधी यांच्यासोबत या दौऱ्यात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी उपस्थित होत्या.