नवी दिल्ली : 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आतापासूनच रणनीती बनवण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, गेल्या दोन लोकसभा आणि नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला होता. अशा परिस्थितीत काँग्रेस आता राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांची मदत घेत आहे.
प्रशांत किशोर यांच्या सूचनांवर काम करण्यासाठी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी वरिष्ठ नेत्यांचे पॅनल तयार केले आहे. काँग्रेसच्या या 'पीके कमिटी' मध्ये दिग्विजय सिंह, मुकुल वासनिक, रणदीप सुरजेवाला, केसी वेणुगोपाल, पी चिदंबरम, अंबिका सोनी, जयराम रमेश यांचा समावेश आहे. प्रशांत किशोर यांच्यासोबत काल बैठक झाल्यानंतर आजही या नेत्यांची 10 जनपथवर मॅरेथॉन बैठक झाली. आठवडाभरात हे पॅनल आपला अहवाल काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पाठवणार आहे.
370 जागांवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्लाप्रशांत किशोर यांनी काँग्रेसला उत्तर प्रदेश, बिहार आणि ओडिशामध्ये एकट्याने निवडणूक लढवण्याचा सल्ला दिल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रात आघाडी करून लढण्याची सूचना केली आहे. प्रशांत किशोर यांच्या सूचनेवरून राहुल गांधी यांनी संमती दिल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय, प्रशांत किशोर यांनी 2024 च्या निवडणुकीत काँग्रेसला 370 जागांवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला आहे.
येत्या काही दिवसांत पुन्हा दोन बैठका होणारविशेष म्हणजे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी मंगळवारी पुन्हा एकदा प्रशांत किशोर यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीला काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधीही उपस्थित होत्या. प्रशांत किशोर आणि काँग्रेस नेत्यांमध्ये गेल्या चार दिवसांतील ही तिसरी बैठक आहे. पहिली बैठक 16 एप्रिलला झाली आणि त्यानंतर दुसरी बैठक 18 एप्रिलला झाली. या बैठकांमध्ये सोनिया गांधीही उपस्थित होत्या. दरम्यान, प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये प्रवेश करू शकतात, असे सांगण्यात येत आहे. तसेच, येत्या काही दिवसांत अशा आणखी दोन बैठका होऊ शकतात, असे सूत्रांनी सांगितले.