सोनिया गांधी-गहलोत २ तास चर्चा; अर्ज करताना शक्तिप्रदर्शन करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2022 06:47 AM2022-09-22T06:47:21+5:302022-09-22T06:47:57+5:30

अशोक गहलोत यांनी मंगळवारी जयपूरमध्ये विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत सांगितले होते की, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची मनधरणी करण्याचा अखेरचा प्रयत्न मी करणार आहे.

Sonia Gandhi-Gehlot 2 hours discussion; Will demonstrate power while applying | सोनिया गांधी-गहलोत २ तास चर्चा; अर्ज करताना शक्तिप्रदर्शन करणार

सोनिया गांधी-गहलोत २ तास चर्चा; अर्ज करताना शक्तिप्रदर्शन करणार

Next

आदेश रावल 

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत हे आता निश्चित झाले आहे. गहलोत यांनी राजस्थानातील आमदारांना अर्ज दाखल करण्यासाठी आमंत्रित केले आहे. तत्पूर्वी, शुक्रवारी गहलोत हे शिर्डीत साईबाबांच्या दर्शनाला जाणार आहेत. पक्षाध्यक्ष सोनिया गांधी आणि गहलोत यांच्यात बुधवारी नवी दिल्लीत दोन तास चर्चा झाली. 

अशोक गहलोत यांनी मंगळवारी जयपूरमध्ये विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत सांगितले होते की, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची मनधरणी करण्याचा अखेरचा प्रयत्न मी करणार आहे. जर ते तयार झाले नाहीत आणि मला अर्ज दाखल करण्यासाठी निर्देश देण्यात आले तर सर्व आमदारांना २६ सप्टेंबरला दिल्लीत अर्ज दाखल करण्यासाठी यावे लागेल. गहलोत हे बुधवारी रात्री मुंबईकडे रवाना होत आहेत तर, गुरुवारी सकाळी केरळमध्ये राहुल गांधी यांच्यासोबत भारत जोडो यात्रेत सहभागी होतील. 

गहलोत हे अर्ज दाखल करण्यापूर्वी शुक्रवारी शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेतील. दिल्लीत दाखल झाल्यानंतर गहलोत यांनी बुधवारी सांगितले की, ‘एक व्यक्ती, एक पद’ हा फॉर्म्युला संघटनेतील नियुक्तीशी संबंधित आहे. ही तर निवडणूक आहे. त्यात मुख्यमंत्री असो की, मंत्री अर्ज दाखल करू शकतात. या निवडणुकीचा एक व्यक्ती, एक पदाशी संबंध नाही. उदयपूर येथील चिंतन शिबिरात एक व्यक्ती एक पदाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. गहलोत हे मुख्यमंत्रिपदाची खुर्ची सोडू इच्छित नाहीत. मात्र, याबाबतचा निर्णय काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना घ्यायचा आहे.

२४ वर्षांनंतर सूत्रे बिगर गांधी व्यक्तीकडे जाणार... 
काँग्रेसची सूत्रे बिगर गांधी व्यक्तीकडे जाणे आता निश्चित मानले जात आहे. १९९८ मध्ये सीताराम केसरी यांच्या जागी सोनिया गांधी अध्यक्ष झाल्या होत्या. त्यानंतर २०१७ मध्ये राहुल गांधी हे अध्यक्ष झाले होते. पण, २०१९ मध्ये त्यांनी पद सोडले होते. २०१९ पासून सोनिया गांधी या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत आहेत. पण, प्रकृतीच्या कारणास्तव त्यांनी अध्यक्ष होण्यास नकार दिलेला आहे. 

राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष होणार नाहीत
नवी दिल्ली : काँग्रेसचे नवे अध्यक्ष कोण होणार, याबाबत चर्चा सुरू असतानाच पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी बुधवारी स्पष्ट केले की, काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेवेळी भारत जोडो यात्रेत असणार आहेत. ते दिल्लीत येणार नाहीत. त्यामुळे हे स्पष्ट झाले आहे की, राहुल गांधी हे अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारणार नाहीत. 

काँग्रेसचे खासदार शशी थरूर हे बुधवारी सकाळी काँग्रेसच्या मुख्यालयात दाखल झाले आणि त्यांनी केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाच्या संबंधितांशी चर्चा केली. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत हेही काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांना भेटण्यासाठी सकाळी दाखल झाले. 
राहुल गांधी हे २३ सप्टेंबर रोजी भारत जोडो यात्रेतून दिल्लीत येतील. जयराम रमेश यांनी सांगितले की, राहुल गांधी हे सोनिया गांधी यांची भेट घेतील. नव्या अध्यक्षपदाबाबत यावेळी त्यांच्यात चर्चा होऊ शकते. सोनिया गांधी यांनी मंगळवारी संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांना केरळमधून बोलाविले होते. 

Web Title: Sonia Gandhi-Gehlot 2 hours discussion; Will demonstrate power while applying

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.