नवी दिल्ली - नवी दिल्लीमध्ये काँग्रेसच्या संसदीय दलाची बैठक सुरू आहे. काँग्रेस कमिटीच्या बैठकीत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. काँग्रेसच्या संसदीय दलाच्या नेतेपदी सोनिया गांधी कायम राहणार असल्याची माहिती काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी दिली आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी, मनमोहन सिंह यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
लोकसभेत काँग्रेसचा नेता निवडण्यासाठी एक जून रोजी काँग्रेसच्या संसदीय दलाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात ही बैठक होत आहे. यावेळी पुढील लोकसभेच्या सत्रासाठीची रणनिती ठरविण्यात येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. राहुल यांचा राजीनामा पक्षाने स्वीकारल्यास त्यांच्याकडे वेगळी जबाबदारी येण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला दारुण पराभव पत्करावा लागला आहे. काँग्रेसला केवळ 52 जागांवर विजय मिळविण्यात यश आले आहे. त्यामुळे काँग्रेसला या निवडणुकीत देखील 2014 प्रमाणे विरोधी पक्ष नेते पद मिळणार नाही. त्यातच आता लोकसभेचा नेता निवडण्यासाठी काँग्रेससमोर पेच निर्माण झाला आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे सध्याच्या घडीला काँग्रेसकडे प्रभावी चेहऱ्यांची कमतरता आहे. दरम्यान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यावर ठाम आहेत. त्यांचा राजीनामा पक्षाने स्वीकारल्यास, राहुल यांच्याकडे लोकसभेचे नेतेपद देण्यात येईल अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी ही शक्यता फेटाळली आहे. तर राहुल यांनी नेता होण्यास नकार दिल्यानंतर ज्येष्ठतेनुसार या पदासाठी मनिष तिवारी आणि शशी थरूर यांचा विचार होण्याची शक्यता आहे.
शरद पवार काँग्रेसचे अध्यक्ष, राहुल विरोधी पक्षनेते?
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नाही म्हणत असले, तरी काँग्रेसमध्ये तो पक्ष विलीन होण्याची शक्यता आहे. उच्चपदस्थांच्या माहितीनुसार दोन्ही पक्षांत चर्चा सुरू आहे. मात्र, विलीनीकरणानंतर राज्य नेतृत्वाबाबत काय करायचे, हे स्पष्ट झालेले नाही. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या एका निकटवर्तीयाने सांगितले की, विलीनीकरण होणार, हे जवळपास नक्की आहे. मात्र, त्यासाठी किती कालावधी लागेल, हे आताच सांगणे शक्य नाही. काँग्रेसच्या एका नेत्याने सांगितले की, राहुल गांधी व शरद पवार यांच्या गुरुवारच्या भेटीत याबाबत चर्चा झाली नाही, कारण दोघांत हा विषय आधीच चर्चिला गेला आहे. या दोघा नेत्यांच्या विचारांत कमालीचे साधर्म्य असून, लोकसभा निवडणुकांचे निकाल पाहता, दोन्ही पक्षांना विलिनीकरणाबाबत निर्णय घेण्याची वेळ आली आहे.