काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या श्वास नलिकेमध्ये कोरोनाचे गंभीर संक्रमण झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांना दिल्लीच्या गंगाराम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सोनिया गांधी यांच्या प्रकृतीविषयी आज काँग्रेसने महत्वाची माहिती दिली आहे.
सोनिया गांधी यांच्या नाकातून काही दिवसांपूर्वी रक्तस्त्राव होत होता. माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी सांगितले की, सोनिया गांधी अद्यापही दिल्लीच्या गंगाराम हॉस्पिटलमध्ये भरती आहेत. त्यांच्या श्वासनलिकेत कोरोना संक्रमण झाल्यानंतरच्या त्रासावर उपचार सुरु आहेत. त्यांच्या प्रकृतीवर रुग्णालयाचे डॉक्टर लक्ष ठेवून आहेत.
सोनियांना कोरोना झाल्यानंतर प्रकृतीच्या तक्रारीमुळे १२ जूनला गंगाराम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. २ जून रोजी त्यांना कोरानाची लागण झाली होती. गुरुवारी त्यांना श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला होता. यानंतर तपासणीवेळी त्यांच्या श्वास नलिकेला फंगल इन्फेक्शन असल्याचे समजले. त्यांना अन्य प्रकारचे देखील त्रास होत आहेत.
ईडीची पुन्हा नोटीसदरम्यान, नॅशनल हेराल्ड केस प्रकरणी ईडीने सोनिया गांधी यांना पुन्हा नव्याने समन्स जारी केले आहेत. यामध्ये त्यांनी २३ जूनला चौकशीसाठी हजर राहण्याचे म्हटले आहे. यापूर्वी त्यांना ८ जूनला चौकशीला हजर राहण्यास सांगण्यात आले होते. परंतू कोरोनामुळे त्यांनी नवीन तारीख देण्याची मागणी केली होती. राहुल गांधी यांची ईडीने चौकशी केली आहे. गुरुवारीदेखील त्यांना चौकशीला बोलविण्यात आले होते. परंतू सोनिया गांधीची प्रकृती खराब असल्याने राहुल यांना सोमवारी येण्याची मुभा देण्यात आली आहे.