सोनिया गांधी आज विरोधी पक्षांच्या नेत्यांबरोबर घेणार डिजिटल बैठक; महाराष्ट्र, झारखंडसह इतर राज्यांचे मुख्यमंत्री होणार सहभागी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2021 05:52 AM2021-08-20T05:52:58+5:302021-08-20T05:57:37+5:30
Sonia Gandhi : सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशासमोरील प्रमुख मुद्द्यांवर विरोधी पक्षांना बरोबर घेऊन सरकारला घेरण्याचा सोनिया गांधी यांचा प्रयत्न असणार आहे. त्यासाठी ही बैठक बोलावली आहे.
नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी शुक्रवारी प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत. या डिजिटल बैठकीत महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, तामिळनाडू व झारखंडचे मुख्यमंत्री सहभागी होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशासमोरील प्रमुख मुद्द्यांवर विरोधी पक्षांना बरोबर घेऊन सरकारला घेरण्याचा सोनिया गांधी यांचा प्रयत्न असणार आहे. त्यासाठी ही बैठक बोलावली आहे. भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात राष्ट्रीय स्तरावर विरोधकांना एकत्र करण्यात येणार आहे. पुढील लोकसभा निवडणुकीमध्ये विरोधी पक्षांकडून कडवे आव्हान उभे करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.
संसदेच्या नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात पेगासस हेरगिरी वाद, शेतकरी आंदोलन व महागाईच्या मुद्द्यावर सरकारच्या विरोधात विरोधकांची एकजूट पाहावयास मिळाली. त्यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी हे विरोधकांच्या एकजुटीचे केंद्रबिंदू झाले होते. सोनिया गांधी यांच्या डिजिटल बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टालिन, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यासह अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे.
राष्ट्रीय सुरक्षाबाबत चर्चा?
शुक्रवारच्या बैठकीचा अजेंडा समोर आलेला नसला तरी विरोधी पक्षांनी विविध मुद्द्यांवर चर्चा करावी व एकजूट दाखवावी, याबाबत चर्चा होणार आहे. अफगाणिस्तानमधील स्थिती व ईशान्येकडील ताज्या घटनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष सरकारला राष्ट्रीय सुरक्षेबाबत काही सवाल करू शकतात.