लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर हरयाणातील सोनीपतमधील मदिना गावात भातशेती करतानाचे काही फाेटाे साेशल मीडियावर शेअर केले हाेते. तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधताना महिलांनी दिल्लीला येण्याची इच्छा व्यक्त केली, त्यावर गेल्या शुक्रवारी प्रियांका यांच्याशी बोलल्यानंतर राहुल यांनी या महिलांना खास वाहन पाठवून दिल्लीला बोलावले. सर्व महिलांनी प्रियांका आणि सोनिया गांधी यांची भेट घेतली. यावेळी सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी यांनी या महिलांसोबत जेवण केले आणि गप्पाही मारल्या आणि चर्चा केली. तसेच हरयाणवी गाण्यावर या महिलांसोबत सोनिया गांधी यांनीही ठेका धरला.
सुमारे १२ मिनिटांच्या यूट्यूब व्हिडीओमध्ये राहुल गांधी शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संभाषण करताना, शेतात नांगरणी करताना, भाताची रोपे लावताना आणि नंतर एका खाटेवर शेतकऱ्यांसोबत भाकरी खाताना दिसतात. ‘शेतकरी हे भारताचे सामर्थ्य आहे आणि आपण त्यांचे ऐकले आणि त्यांचा दृष्टिकोन समजून घेतला तर देशातील अनेक समस्या सुटू शकतात,’ अशी भावना राहुल गांधी यांनी व्यक्त केली. काँग्रेसने ट्विटरवर म्हटले की, भारताला जोडण्यात शेतकऱ्यांचे मोठे योगदान आहे.