रेवंत रेड्डींच्या शपथविधीला सोनिया गांधी उपस्थित राहणार? तेलंगणात उद्या नवीन सरकार स्थापन होणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2023 04:31 PM2023-12-06T16:31:05+5:302023-12-06T16:31:50+5:30
राज्याच्या मुख्य सचिव ए. शांती कुमारी यांनी शपथविधी सोहळ्याच्या तयारीबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि बुधवारी एलबी स्टेडियमलाही भेट दिली.
हैदराबाद : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विजयानंतर तेलंगणाकाँग्रेसचे अध्यक्ष अनुमुला रेवंत रेड्डी हे गुरुवारी राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. 56 वर्षीय रेवंत रेड्डी यांचा शपथविधी सोहळा गुरुवारी दुपारी 1:04 वाजता हैदराबादच्या विशाल एलबी स्टेडियमवर होणार आहे. राज्याच्या मुख्य सचिव ए. शांती कुमारी यांनी शपथविधी सोहळ्याच्या तयारीबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि बुधवारी एलबी स्टेडियमलाही भेट दिली.
रेवंत रेड्डी यांच्यासह किती आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार याची माहिती अद्याप समोर आली नाही. दरम्यान, रेवंत रेड्डी यांनी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी अध्यक्षा सोनिया गांधी, पक्षाचे नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी वाड्रा यांची भेट घेतली. यावेळी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी रेवंत रेड्डी यांचे अभिनंदन केले. तसेच, सोनिया गांधी गुरुवारी हैदराबादमध्ये रेवंत रेड्डी यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहू शकतात.
संसदेबाहेर पत्रकारांनी सोनिया गांधींना या संदर्भात प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या, 'कदाचित'. दरम्यान, रेवंत रेड्डी यांच्या शपथविधी सोहळ्याला पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. काँग्रेसशासित राज्यांचे मुख्यमंत्रीही शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहू शकतात, असे म्हटले जात आहे.
काँग्रेसने तेलंगणात 64 जागा जिंकल्या
काँग्रेस हायकमांडने मंगळवारी रेवंत रेड्डी यांना काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे (CLP) नेते आणि तेलंगणाचे पुढील मुख्यमंत्री म्हणून नियुक्त केले. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भारत राष्ट्र समितीचा (BRS) पराभव केला आणि एकूण 119 जागांपैकी 64 जागा जिंकल्या. सत्ताधारी भारत राष्ट्र समितीला 39 जागांवर समाधान मानावे लागले.