- शीलेश शर्मानवी दिल्ली : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मोदी सरकार आणि भाजपाचे नाव न घेता देशातील विचलित करणाऱ्या घटनांचा उल्लेख करीत चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, देशात गेल्या काही वर्षांत धार्मिक धु्रवीकरण, हिंसाचाराच्या घटना, जमावाकडून होणाºया हत्या या घटनांमुळे राष्ट्रीय एकात्मतेला धक्का बसत आहे. देशासाठी हे चांगले संकेत नाही. गोपालकृष्ण गांधी यांना राजीव गांधी सद्भावना पुरस्कार देण्यासाठी काँग्रेसकडून आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. आपण सर्वांनी मिळून या आव्हानांचा मुकाबला केला पाहिजे, असेही सिंग यावेळी म्हणाले.यावेळी बोलताना यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी म्हणाल्या की, राजीव गांधी हे नेहमी म्हणत असत की, देशातील विविधतेतूनच एकात्मतेला ताकद मिळते. त्यांच्यासाठी हीच सद्भावना होती. राजीव गांधी यांचे विचार होते की, देशातील प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जीवन जगण्याचा, सुरक्षेचा आणि आत्मसन्मानाचा अधिकार मिळावा. भिन्न विचारांचा सन्मान केला जावा. ते विचार आपलेच असावेत असे नाही, तर दुसºयांचे असले तरी सन्मान द्यावा. विचार व्यक्त करण्याची स्वतंत्रता असावी. सोनिया गांधी यांचा निशाणा मोदी यांच्यावर होता. अर्थात, त्यांनी ना भाजपाचे नाव घेतले ना मोदी यांचे; पण सोनिया गांधी यांनी तेच मुद्दे उपस्थित केले ज्या मुद्यांवर काँग्रेस सातत्याने मोदी सरकारवर हल्ला करीत आहे.सोनिया गांधी यांनी देशाच्या बिघडत्या आर्थिक व्यवस्थेवर चिंता व्यक्त केली. राजीव गांधी यांचा उल्लेख करून त्या म्हणाल्या की, ते आर्थिक विकास आणि आधुनिकीकरणाच्या बाजूने होते. विज्ञान आणि तंत्रज्ञानात जगाला अग्रेसर देशाच्या यादीत ते पाहू इच्छित होते; पण त्यांना सामाजिक उदारीकरण हवे होते. त्यांचे असे म्हणणे होते की, ही दोन्ही कामे सोबतच व्हायला हवीत. आज सरकार खुल्या अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देत आहे; पण याचे परिणाम धोकादायक आहेत.माजी राज्यपाल आणि महात्मा गांधी यांचे नातू गोपालकृष्ण गांधी यांनी यावेळी निर्णायक मंडळाप्रती आभार व्यक्त केले. यावेळी कर्णसिंह, मोतीलाल व्होरा यांच्यासह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते. त्यापूर्वी सोमवारी सकाळी सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी, रॉबर्ट वाड्रा यांची उपस्थिती होती. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त वीरभूमी येथे जाऊन पुष्पांजली अर्पण केली.
सोनिया गांधी, मनमोहनसिंग यांना धार्मिक ध्रुवीकरणाबाबत चिंता
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 2:08 AM