नवी दिल्ली : आयएनएक्स मीडिया घोटाळ्यातील आरोपी व माजी केंद्रीय वित्तमंत्री पी. चिदम्बरम यांची काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी व माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी सोमवारी तिहार तुरुंगामध्ये जाऊन भेट घेतली. या दोन नेत्यांसोबत चिदम्बरम यांचे पुत्र व खासदार कार्ती हेदेखील होते.हे दोन्ही नेते तुरुंगात भेटायला आल्याबद्दल पी. चिदम्बरम यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. त्याबद्दलचे टिष्ट्वट चिदम्बरम यांच्या सांगण्यावरून त्यांच्या कुटुंबियांनी केले. त्यात म्हटले आहे की, सोनिया गांधी, मनमोहनसिंग यांच्या भेटीमुळे मी धन्य झालो. काँग्रेस पक्ष समर्थ व शूरांचा पक्ष असून माझेही वर्तन तसेच राहणार आहे. सुमारे अर्धा तास ही भेट झाली.यासंदर्भात कार्ती चिदम्बरम यांनी म्हटले आहे की, काँग्रेसच्या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांच्या भेटीमुळे राजकीय लढाई लढण्यासाठी आम्हाला निश्चितच मोठे पाठबळ मिळाले आहे. आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, असे सोनिया गांधी यांनी पी. चिदम्बरम यांना सांगितल्याचे सूत्रांनी सांगितले.कॉर्पोरेट टॅक्समध्ये केंद्राने केलेली मोठी कपात तसेच जीएसटीमध्ये दिलेल्या सवलती या मुद्द्यांवर तसेच या निर्णयांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या परिणामांबद्दल चिदम्बरम यांनी मनमोहनसिंग यांच्याशी तिहार तुरुंगात चर्चा केल्याचे कळते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद, अहमद पटेल यांनीही गेल्या आठवड्यात पी. चिदम्बरम यांची तिहार तुरुंगात भेट घेतली होती.अधिकारांच्या गैरवापराचा इन्कारवैयक्तिक हितासाठी वित्तमंत्रीपदाचा गैरवापर केल्याच्या आरोपाचा पी. चिदम्बरम यांनी दिल्ली उच्च न्यायालयात सोमवारी इन्कार केला.आयएनएक्स मीडिया प्रकरणातील खटल्यात त्यांच्या जामीन अर्जावर सीबीआयने दिलेल्या उत्तरावर प्रत्युत्तर देताना चिदम्बरम यांनी म्हटले आहे की, माझ्यावर याआधीच लूक आऊट नोटीस जारी करण्यात आली आहे.मी कायद्याचा भंग करण्याची तसेच दुसºया देशात पळून जाण्याची शक्यता असल्याचे सीबीआयने व्यक्त केलेले मत हास्यास्पद आहे.
चिदम्बरम यांच्या भेटीला सोनिया गांधी, मनमोहनसिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2019 2:42 AM