नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या आणि देशाच्या राजकारण मोठ्या घडमोडी घडत आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) दिल्ली दौऱ्यानंतर महाराष्ट्र दौऱ्यावर आल्या होत्या. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली होती. यानंतर आता शरद पवार दिल्लीला गेले असून, त्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांची भेट घेतली. यासंदर्भात शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी माहिती दिली असून, बैठक कशासंदर्भात होती, याबाबत गुप्तता पाळण्यात आली असली, तरी या भेटीनंतर राजकीय वर्तुळात मात्र चर्चांना उधाण आल्याचे सांगितले जात आहे.
शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यात झालेल्या बैठकीवेळी संजय राऊत यांच्यासह जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूक अब्दुल्ला आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे हेदेखील उपस्थित होते, अशी माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा राजकीय हलचाली वाढल्याचे पहायला मिळत आहे. विशेष म्हणजे ममता बॅनर्जी मुंबईत येऊन शरद पवारांची भेट घेऊन गेल्यानंतर पहिल्यांदाच पवार आणि सोनिया गांधीची भेट झाली असल्याचे वेगवेगळ्या चर्चा रंगल्याचे म्हटले जात आहे.
आम्ही एकत्रित काम करणार आहोत
आम्ही एकत्रित काम करणार आहोत, आमच्यात पुन्हा बैठक होणार आहे. तसेच आमची बैठक पूर्वनियोजित होती. राजकीय स्वरुपाची बैठक असली तरी, अनेक गोष्टी सांगता येत नाही, पुढची रणनिती काय करता येईल याची चर्चा झाली, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली. याशिवाय या बैठकीला उद्धव ठाकरे यांना आमंत्रण होते. मात्र, ते प्रवास करू शकत नाहीत, त्यामुळे शिवसेनेचा प्रतिनिधी म्हणून गेलो होतो, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले. तसेच राज्यसभेतील १२ खासदारांना निलंबित करण्यात आल्याचा मुद्दा प्रामुख्याने चर्चेचा घेतला गेला. या प्रकरणी पुढील रणनीती तयार करण्याविषयी चर्चा झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
दरम्यान, दिल्ली दौऱ्यावर असताना ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मात्र, त्या सोनिया गांधी यांच्या भेटीला गेल्या नाहीत. दिल्लीत आल्यावर प्रत्येक वेळी सोनिया गांधी यांची भेट का घ्यायची, सोनिया गांधींना भेटणे घटनात्मकदृष्ट्या बंधनकारक आहे का, अशी खोचक विचारणा ममता बॅनर्जी यांनी केली होती.