नवी दिल्ली-
पाच राज्यांतील नुकत्याच झालेल्या पराभवानंतर रविवारी झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत सोनिया गांधींनी राजीनामा सादर केला. पण पक्षाच्या सर्व नेत्यांनी सोनिया यांचा राजीनामा फेटाळून लावला आहे. दुसरीकडे, सोनिया गांधींच्या राजीनामा पत्रानंतर काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद, अजय माकन, आनंद शर्मा यांनी नरमाईची भूमिका घेतली असून आमचा सल्ला पक्षाच्या भल्यासाठी आहे, आम्हाला विरोधक किंवा शत्रू समजू नका, असं बैठकीत म्हटल्याचं सांगितलं जात आहे. काँग्रेस पक्ष लवकरच चिंतनशिबीर घेणार आहे. काँग्रेस कार्यकारिणीची आजची बैठक सुमारे चार तास चालली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, "पक्षाला कुठेतरी एकट्याने किंवा युती करून राज्यवार रणनीती बनवावी लागेल. त्याचवेळी निकाल आपल्या बाजूने लागणार नाही हे आम्हाला माहीत होते, पण मेहनत केली आणि लढा दिला", असे प्रियंका गांधी बैठकीत म्हणाल्या. बैठकीत पाच राज्यातील निवडणूक प्रभारींनी अहवाल दिला. बैठकीत जी 21 च्या नेत्यांची भूमिका यावेळी नरमाईची दिसून आली.
"काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया या आमचे नेतृत्व करतील आणि भविष्यातील निर्णय त्याच घेतील. आम्हा सर्वांचा त्यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे", असं पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीनंतर काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे म्हणाले. तसंच पक्षाच्या अध्यक्षपदी सोनिया गांधी कायम राहतील. पाच राज्यांच्या निवडणुकांबाबत सविस्तर चर्चा झाली. गोष्टी कशा पुढे न्याव्यात आणि आगामी निवडणुकीची तयारी कशी करायची यावर आम्ही चर्चा केली, असं AICC गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव म्हणाले.
2024 च्या लोकसभा निवडणुकीसह आगामी निवडणुकांमध्ये निवडणूक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी काँग्रेस पक्ष पूर्णपणे सज्ज आहे आणि CWC ने एकमताने सोनिया गांधींच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला आहे. तसंच त्यांना आघाडीचं नेतृत्व करण्याची विनंती केल्याचं काँग्रेसच्यावतीनं या बैठकीनंतर सांगण्यात आलं आहे.
राहुल यांनी नेतृत्व करण्याचीही अनेकांची विनंतीराहुल गांधींनी पक्षाचे नेतृत्व करावे, अशी प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्यांची इच्छा असून संघटनात्मक निवडणुका सुरू आहेत, पुढचा अध्यक्ष त्यातूनच ठरवला जाईल, असं रणदीप सुरजेवाला म्हणाले. तसंच आणखी काही काँग्रेस नेत्यांनी राहुल यांच्या नावाचा पुनरुच्चार यावेळी केला.