नवी दिल्ली - माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची आज पुण्यतिथी आहे. राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियंका गांधी आणि रॉबर्ट वाड्रा यांनी वीरभूमीवर जाऊन त्यांना आदरांजली वाहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनीही यावेळी राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी हे यावेळी उपस्थित होते.
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी टेलिकॉम, आयटी, पंचायत राजसहीत अन्य कित्येक क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान दिले आहे. 1984 पासून ते 1989 पर्यंत राजीव गांधी यांनी पंतप्रधानपद भूषवले आहे. राजीव गांधी यांचा जन्म 20 ऑगस्ट 1944 रोजी मुंबईमध्ये झाला होता आणि 21 मे, 1991 रोजी त्यांची हत्या करण्यात आली. तामिळनाडूतील श्रीपेरंबुदूर येथे 21 मे 1991 रोजी महिला सुसाईड बॉम्बरद्वारे एलटीटीईच्या दहशतवाद्यांनी राजीव गांधी यांची हत्या केली होती.