आदेश रावल लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : ‘नॅशनल हेरॉल्ड’शी संबंधित कथित मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांचा मंगळवारी दुसऱ्यांदा जबाब नोंदवला. अडीच तास चौकशीनंतर दुपारी भोजनासाठी कार्यालयाबाहेर पडल्या. परतल्यानंतर त्यांची चौकशी चालली. एकूण सहा तास चौकशीनंतर त्या घरी परतल्या. सोनिया गांधी यांच्या चौकशीच्या निषेधार्थ काँग्रेसने देशभरात ठिकठिकाणी निदर्शने केली. राहुल गांधी, काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि खासदारांनी या चौकशीच्या निषेधार्थ निदर्शने केल्यानंतर पोलिसांनी विजय चौकात त्यांना ताब्यात घेतले.
झेड प्लस सुरक्षा व्यवस्थेत सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यासमवेत सकाळी ११ वाजता मध्य दिल्लीस्थित ईडीच्या कार्यालयात पोहोचल्या. प्रियांका गांधी ईडीच्या कार्यालयातच थांबल्या, तर राहुल गांधी यांनी तेथून बाहेर निघाल्यानंतर राष्ट्रपती भवननजीक विजय चौकात निदर्शनांचे नेतृत्व केले, त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
पोलीसराज, मोदी राजे आहेतभारतात पोलीसराज असून, मोदी राजे आहेत. संसदेत चर्चा करू दिली जात नाही. आम्हांला पोलिसांनी राष्ट्रपती भवनाकडे जाऊ दिले नाही. बघा, हुकूमशाही. शांततेने निदर्शने करू शकत नाही. पोलीस आणि संस्थांचा दुरुपयोग करून आम्हाला अटक करूनही तुम्ही आम्हांला गप्प करू शकणार नाही. या हुकूमशाहीचा शेवट सत्यच करील. - राहुल गांधी