ब्रेकिंग : निर्णय झाला! काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षपदी सोनिया गांधी कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2020 06:25 PM2020-08-24T18:25:49+5:302020-08-24T18:37:12+5:30
काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षपदी सोनिया गांधी यांनाच कायम ठेवण्याचा निर्णय काँग्रेसच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
नवी दिल्ली - काही ज्येष्ठ नेत्यांनी पत्र लिहून केलेली नेतृत्व बदलाची मागणी, सोनिया गांधींनी पद सोडण्याची व्यक्त केलेली इच्छा, राहुल गांधींनी काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारण्यास दिलेला नकार आणि कार्यकारी समितीच्या बैठकीत झालेली खडाखडी अशा गेले दोन दिवस चाललेल्या नाट्यानंतर अखेर आज काँग्रेसच्या अध्यक्षपदाबाबत मोठा निर्णय झाला आहे. पक्षाच्या हंगामी अध्यक्षपदी सोनिया गांधी यांनाच कायम ठेवण्याचा निर्णय काँग्रेसच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
२०१९ मध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर राहुल गांधी यांनी पक्षाचे अध्यक्षपद सोडले होते. त्यानंतर काँग्रेसच्या नव्या अध्यक्षावरून बराच खल होऊन अखेरीस नव्या अध्यक्षाची निवड होईपर्यंत सोनिया गांधींकडे पक्षाचे हंगामी अध्यक्षपद सोपवण्यात आले होते. दरम्यान, आता २३ नेत्यांनी पत्र लिहून केलेल्या नेतृत्वबदलाच्या मागणीनंतर काँग्रेसच्या नव्या अध्यक्षाबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली होती. मात्र पुन्हा एकदा सोनिया गांधी यांच्याकडेच कार्यकारी अध्यक्षपद सोपवण्याचा निर्णय कार्यकारी समितीने घेतला.
Sonia Gandhi to remain Congress party's interim president for now, new chief to be elected within next 6 months. Congress Working Committee (CWC) meeting has concluded after 7 hours: Sources
— ANI (@ANI) August 24, 2020
सोनिया गांधींना लिहिलेल्या पत्रात नेमकं होतं काय?
देशभरातील काँग्रेसच्या २३ वरिष्ठ नेत्यांनी पक्षात मोठ्या बदलांची गरज असल्याचं मत त्यांनी पत्रातून व्यक्त केली आहे. पक्षाला पूर्ण वेळ आणि प्रभावी अध्यक्ष गरजेचा असल्याची महत्त्वाची मागणी २३ नेत्यांनी पत्रातून केली. यामध्ये काँग्रेस कार्यसमितीच्या अनेक सदस्यांसह, पाच माजी मुख्यमंत्री, खासदार आणि माजी केंद्रीय मंत्र्यांचा समावेश आहे. पक्ष जनाधार आणि तरुणांचा विश्वास गमावत आहे. पक्षाला प्रभावी नेतृत्त्वाची गरज आहे. तो केवळ काम करताना दिसू नये, तर त्याचं काम प्रत्यक्ष जमिनीवर दिसायला हवं. सीडब्ल्यूसीची निवडणूक व्हायला हवी आणि पक्षाला पुन्हा उभारी घ्यावी यासाठी ठोस योजना तयार करायला हवी, असं २३ नेत्यांनी पत्रात म्हटलं आहे.
काँग्रेस नेत्यांनी मांडल्या अडचणी-
१. राज्य काँग्रेसचे अध्यक्ष, पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तांमध्ये नाहक विलंब.
२. सन्मान आणि स्वीकारार्ह असलेल्या नेत्यांच्या प्रदेश काँग्रेसवर नियुक्त्या होत नाहीत.
३. राज्य प्रमुखांना संघटनेशी संबंधित निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य नाही.
४. युथ काँग्रेस आणि एनएसयूआयमधील निवडणुकांमुळे संतुलन बिघडलं.
काँग्रेस नेत्यांच्या मागण्या काय?
१. नेतृत्वात स्थायी आणि प्रभावी बदल व्हावेत.
२. काँग्रेस कार्यकारी समितीच्या निवडणूक व्हाव्यात
३. पक्षानं गमावलेली ताकद परत मिळवण्यासाठी योजना गरजेची
४. संघटनेतील प्रत्येक स्तरावर निवडणूक व्हावी
५. संसदीय पार्टी बोर्डाची स्थापना व्हावी.
६. प्रदेश काँग्रेसला ताकद दिली जावी.
पत्रावर कोणाच्या स्वाक्षऱ्या?
राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाम, माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा, कपिल सिब्बल, मनीष तिवारी, शशी थरूर, खासदार विवेक तनखा, AICC आणि CWC चे मुकुल वासनिक आणि जितिन प्रसाद, माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा, राजेंद्र कौर भटट्ल, वीरप्पा मोइली, पृथ्वीराज चव्हाण, पी. जे. कुरियन, अजय सिंह, रेणुका चौधरी आणि मिलिंद देवरा, प्रदेशाध्यक्ष सांभाळण्याचा अनुभव असलेले राज बब्बर, अरविंदर सिंह लवली, कौल सिंह यांच्यासह अखिलेश प्रसाद सिंह, कुलदीप शर्मा, योगानंद शास्त्री आणि संदीप दीक्षित.