सुरेश भटेवरा,
नवी दिल्ली- दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयातून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी ११ दिवसांच्या उपचारानंतर १0 जनपथ या आपल्या निवासस्थानी सुखरूप परतल्या. भारताच्या ७0 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशवासियांना उद्देशून त्यांनी लगेच एक संदेशही जारी केला आहे. पंतप्रधान मोदींच्या वाराणसी मतदारसंघात रोड शो करीत असतांना प्रकृतीत अचानक बिघाड झाल्यामुळे एका चार्टर्ड विमानाने ६९ वर्षे वयाच्या सोनिया गांधींना तातडीने दिल्लीला सैन्यदलाच्या रुग्णालयात नेण्यात आले होते. त्यानंतर ३ आॅगस्ट रोजी सर गंगाराम रुग्णालयात त्यांना हलवण्यात आले. शरीरात पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने त्यांना डिहायड्रेशनचा त्रास झाला व तापही आला. उपचारानंतर रुग्णालयातून डिसार्ज देतांना सर गंगाराम हॉस्पिटलच्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष डॉ. डी.एस.राणा म्हणाले, ‘३ आॅगस्ट रोजी श्रीमती गांधींवर एक शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेची जखम बऱ्यापैकी बरी झाली असून त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. नियमित औषधोपचार चालू ठेवण्यासह त्यांना विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. पुढल्या सप्ताहात चेक अप साठी त्या पुन्हा रुग्णालयात येतील.’>स्वातंत्र्य दिनानिमित्त देशातील तरुणांना दिला संदेशस्वातंत्र्यदिन केवळ उत्सव साजरा करण्यापुरता मर्यादीत नसून देशासाठी ज्यांनी प्राणांचे बलिदान केले त्या हुतात्म्यांची व स्वातंत्र्य दिनामागची मूल्ये व सिध्दांतांचे स्मरण करणेही आवश्यक आहे. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी देशातल्या महान क्रांतीकारकांनी अनेक वर्षे निर्धाराने संघर्ष केला. अनेक सुपुत्रांना आपल्या प्राणांचे बलिदान द्यावे लागले. सत्य व अहिंसेच्या मार्गाने आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी केवळ ब्रिटिश साम्राज्याचा पायाच हलवून सोडला नाही, तर जगातल्या अनेक स्वातंत्र्य आंदोलनांनाही प्रेरणाही दिली.स्वातंत्र्यानंतर राष्ट्रनिर्मितीच्या उभारणीत देशातले शेतकरी, कामगार, वैज्ञानिक, शिक्षक, प्राध्यापक, व्यावसायिक व विचारवंतांनीही अमूल्य योगदान दिले आहे. मातृभूमीच्या सेवेत, देशाची अखंडता व एकता कायम ठेवण्यासाठी सैन्यदलाच्या तिन्ही विभागांनी निस्वार्थ सेवा केली आहे. देशवासियांनी या सर्वांपुढे आदराने नतमस्तक व्हावे, असा हा स्वातंत्र्यदिन आहे.