‘सोनिया गांधींचा देशासाठी त्याग, राहुल गांधींचे विचार साईबाबांप्रमाणे’; शिर्डीत रॉबर्ट वाड्रांचं वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2022 09:07 AM2022-10-31T09:07:06+5:302022-10-31T09:07:39+5:30
रॉबर्ट वाड्रा रविवारी शिर्डीतील श्री साईबाबा मंदिरात दर्शन आणि पूजेसाठी आले होते.
काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांचे पती आणि व्यावसायिक रॉबर्ट वाड्रा यांनी रविवारी मोठं वक्तव्य केलं. त्यांनी काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांची तुलना शिर्डीच्यासाईबाबांशी केली. यासोबतच त्यांनी भारत जोडो यात्रेचंही कौतुक केलं. भारत जोडो यात्रेमुळे देशात एक बदल पाहायला मिळेल. हजारो लोक याच्याशी जोडले जात आहेत आणि राहुल गांधींकडे भविष्य म्हणून पाहत आहेत, असं वक्तव्य त्यांनी केलं.
रॉबर्ड वाड्रा रविवारी शिर्डीतील श्री साईबाबा मंदिरात दर्शन आणि पूजेसाठी आले होते. यावेळी त्यांनी यावर भाष्य केलं. “राहुल गांधी यांचे विचार साईबाबा यांच्याप्रमाणेच आहेत. त्यांनी एकतेचा प्रचार केला होता,” असं ते म्हणाले. दरम्यान, वाड्रा यांनी यावर सविस्तर भाष्य केलं नाही.
'साईबाबांचा आशीर्वाद मिळेल'
“सध्या आपला देश मोठ्या संकटाचा सामना करत आहोत. राहुल गांधी यांचे विचार साईबाबा यांच्याप्रमाणेच आहेत. त्यांना साईबाबांचे आशीर्वाद मिळतील अशी अपेक्षा आहे. राहुल गांधी अनेक ठिकाणी जात आहेत आणि हजारो लोकांची भेट घेत आहेत. मोठ्या प्रमाणात लोक त्यांच्याशी जोडले जात आहेत. भविष्यात नक्कीच बदल दिसून येतील कारण राहुल गांधी लोकांसाठी नवी आशा आहेत,” असंही वाड्रा यांनी नमूद केल्याचं वृत्तसंस्थेनं म्हटलं.
'लोकांचं प्रेम मिळतंय'
“भाजप आमच्या कमतरतांबद्दल चर्चा करेल. पक्षाची खिल्लीही उडवतील. परंतु राहुल गांधी आणि प्रियांका गांधी थांबणार नाहीत. ते लोकांमध्येच राहतील. त्यांच्यासाठी एकत्र येऊनच काम करतील. गांधी कुटुंबीयांना अपार प्रेम मिळत आहे,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.
यावेळी त्यांनी पक्षाला रामराम ठोकण्याच्या विचारात असलेल्यांनाही इशारा दिला. ज्यांना पक्ष सोडायचा आहे ते जाऊ शकतात. परंतु जे थांबतील ते सोनिया गांधींचा त्याग आणि राहुल, प्रियांका यांचे प्रयत्न समजून घेतील, असं म्हटलं.