नवी दिल्ली - काँग्रेस नेते अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्यावरुन भाजपाने आक्रमक पवित्रा घेत सोनिया गांधी आणि शरद पवारांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी याबाबत पत्रकार परिषद घेत काँग्रेस राष्ट्रवादीवर टीका केली.
याबाबत बोलताना संबित पात्रा म्हणाले की, समझोता एक्सप्रेसच्या स्फोटावेळी काँग्रेसने हिंदू दहशतवाद शब्द उल्लेख केला होता. १९४९ मध्ये काँग्रेसने अयोध्येतील राम मंदिराचा विरोध केला तेव्हापासून आजतागायत राम मंदिर उभं राहिलं नाही. काँग्रेसने नेहमी हिंदू विरोधात काम केलं आहे. मुस्लिमांना गोंजरण्यासाठी काँग्रेसने हिंदूंचा अपमान केला. मुस्लिमांचाही राजकारणासाठी सोयीस्कर वापर केला गेला. त्यामुळे काँग्रसचं नाव INC नव्हे तर MLC करायला हवं, मुस्लीम लीग काँग्रेस असं नाव करावा असं त्यांनी सांगितले.
तसेच हिंदूंच्या विरोधात वातावरण पेटवलं जात आहे. लोकशाहीच्या देशात एका धर्माला टार्गेट केलं जातं. मुस्लिमांखातर सत्तेत सहभागी झालो या विधानामुळे सोनिया गांधी यांनी माफी मागितली पाहिजे, आव्हाडांनी हिंदूबाबत जे बोलले त्यावरुन शरद पवारांनी माफी मागितली पाहिजे अशी मागणी भाजपाने केली आहे.
दरम्यान, 11 जुलै 2018 रोजी राहुल गांधींनी स्पष्टपणे सांगितले की हो, कॉंग्रेस हा मुस्लिमांचा पक्ष आहे. 9 जुलै 2018 रोजी, कॉंग्रेसचे झेडए खान म्हणतात की देशातील प्रत्येक जिल्ह्यात शरिया कोर्टाची स्थापना व्हावी. 17 मे 2017 युवक कॉंग्रेसच्या नेत्याने केरळमध्ये गायी मारल्या आणि गोमांस सार्वजनिकपणे खायला दिलं. 2016-17 मध्ये राहुल गांधी जेएनयूमध्ये गेले आणि तेथे देशविरोधी घोषणा देण्यात आल्या.
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड म्हणाले की, " मुस्लीम त्यांचे पूर्वज कुठे दफन केले गेले होते ते मुस्लिम सांगू शकतात परंतु त्यांच्या हिंदू पूर्वजांचे अंतिम संस्कार कोठे झाले हे हिंदू सांगू शकणार नाहीत." हे इतके अपमानजनक आहे. हे राजकारणाचे कोणते रूप आहे? असा सवाल संबित पात्रांनी केला.