नवी दिल्ली: काही जण काम करतात. मात्र काही जण काम न करता फक्त श्रेय लाटतात, अशा शब्दांमध्ये यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं कौतुक करत मोदींना लक्ष्य केलं. इंदिरा गांधी शांती पुरस्कार वितरण सोहळ्यात भाषण करताना सोनिया गांधींनी वारंवार मनमोहन सिंग यांची तुलना नरेंद्र मोदी यांच्याशी केली. मनमोहन सिंग यांनी कधीही कोणाच्याही कामांचं श्रेय घेण्याचा प्रयत्न केला नाही. ते स्वत:बद्दल फार बोलायचे नाहीत, असं म्हणत सोनियांनी मोदींवर टीका केली. 'मनमोहन सिंग यांनी इंदिरा गांधींसोबत दीड दशकांपेक्षा अधिक काळ काम केलं. मात्र ते कधीही मोठमोठ्या बाता मारायचे नाहीत. त्यांनी कधीही स्वत:चं कौतुक केलं नाही. त्यांनी कधीच कोणतंही पद मागितलं नाही. देशाचे पंतप्रधान झाल्यावर त्यांनी संपूर्ण जगात सन्मान कमावला. येणाऱ्या काळात आम्ही सतत त्यांचं मार्गदर्शन घेत राहू,' असं म्हणत सोनियांनी मनमोहन यांच्यावर स्तुतिसुमनांचा वर्षाव केला. रविवारी पंतप्रधान मोदींनी छत्तीसगडमध्ये एका जनसभेला संबोधित करताना काँग्रेसला लक्ष्य केलं. काँग्रेसमध्ये फक्त गांधी कुटुंबाला महत्त्व असल्याची टीका त्यांनी केली. काँग्रेसनं गांधी कुटुंबाबाहेरील व्यक्तीला पाच वर्षांसाठी अध्यक्षपद द्यावं, असं आव्हान त्यांनी दिलं. 'सीताराम केसरी या दलित, पीडित आणि शोषित समाजातील व्यक्तीला काँग्रेसनं अध्यक्षपदावरुन कसं दूर केलं, हे संपूर्ण देशाला माहित आहे. त्यांना थेट फुटपाथवर फेकण्यात आलं होतं. त्यानंतर ती जागा सोनिया गांधींना देण्यात आली,' असं मोदी म्हणाले होते.