नवी दिल्ली: काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे लोकशाही हॅक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. बुधवारी लोकसभेत बोलताना सोनिया गांधी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून राजकीय मांडणीचा मुद्दा उपस्थित केला. ''सोशल मीडियाचा वापर करुन आपली लोकशाही हॅक करण्याचा प्रयत्न होतोय,'' असं सोनिया गांधी म्हणाल्या.
काँग्रेस अध्यक्षा पुढे म्हणतात, ''राजकीय पक्ष फेसबुक आणि ट्विटरसारख्या जागतिक कंपन्यांचा वापर पॉलेटीकल नरेटीव्ह सेट करण्यासाठी करत आहेत. या सोशल मीडिया कंपन्या सर्व पक्षांना समान संधी देत नसल्याचे वारंवार निदर्शनास आले आहे. सत्तेच्या संगनमताने फेसबुकद्वारे ज्या प्रकारे सामाजिक सौहार्द बिघडवले जात आहे, ते आपल्या लोकशाहीसाठी घातक आहे'', असं सोनिया गांधी म्हणाल्या.
त्या पुढे म्हणाल्या की, ''जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या निवडणुकीत फेसबुक आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा हस्तक्षेप दिसून आला आहे. मी हा प्रभाव आणि हस्तक्षेप संपवण्याची सरकारला विनंती करते. माझे मत पक्ष आणि राजकारणाच्या पलीकडे आहे. सत्तेत कोणीही असो, आपण आपली लोकशाही आणि सामाजिक सौहार्द जपले पाहिजे. या सोशल साईटवरुन तरुण आणि वृद्धांची मने द्वेषाने भरली जात आहेत,'' असंही त्या म्हणाल्या.
काँग्रेसच्या पाच प्रदेशाध्यक्षांवर कारवाईनुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. पंजाबमध्ये काँग्रेसला आपली सत्ता राखता आली नाही, तर इतर राज्यातही भाजपने काँग्रेसची दयनीय अवस्था केली. या पराभवानंतर सोनिया गांधी यांनी पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक घेऊन पराभवाच्या कारणांचा आढावा घेण्यासोबतच पाचही राज्यांच्या अध्यक्षांकडून राजीनामा मागितला आहे.