सोनिया गांधी राजस्थानातून आज भरणार उमेदवारी अर्ज; कारकिर्दीत प्रथमच राज्यसभेत जाणार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2024 06:03 AM2024-02-14T06:03:10+5:302024-02-14T06:03:40+5:30
काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी २०२४च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातील रायबरेली मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे
आदेश रावल
नवी दिल्ली : काँग्रेस नेत्या सोनिया गांधी बुधवारी राज्यसभेसाठी राजस्थानमधून अर्ज दाखल करणार आहे. यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी त्यांच्यासोबत असतील. यामुळे राहुल गांधी भारत जोडो न्याय यात्रा एक दिवस थांबविणार आहेत.
सोनिया गांधी यांना हिमाचल प्रदेशमधून राज्यसभेचे उमेदवार करावे, अशी पक्षांतर्गत चर्चा आतापर्यंत होती. परंतु, तेथे काँग्रेस आमदारांची संख्या जास्त नाही. त्यामुळे ७० आमदार असलेल्या राजस्थानमधून त्यांना उमेदवारी देण्याचा विचार समोर आला. त्या विजयी झाल्यास प्रथमच राज्यसभेच्या सदस्या बनणार आहेत.
प्रियांका गांधी रायबरेलीतून लढणार?
काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी २०२४च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातील रायबरेली मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी २००४पासून येथून निवडणूक लढवत आहेत. रायबरेली ही जागा काँग्रेसची सुरक्षित जागा मानली जाते. १९५२पासून काँग्रेसचा येथे फक्त तीन वेळा पराभव झाला.
राज्यस्थानातूनच का?
कर्नाटक आणि तेलंगणा काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांनी यापूर्वीच सोनिया गांधी यांना त्यांच्या राज्यातून राज्यसभा सदस्य बनवण्याची इच्छा व्यक्त केली होती. परंतु, पक्षाच्या रणनीतीकारांनी असा तर्क मांडला की, राहुल गांधी हे केरळमधून खासदार आहेत. सोनिया गांधीही दक्षिण भारतातून राज्यसभेच्या सदस्य झाल्या तर काँग्रेसला फक्त दक्षिण भारताचा पक्ष संबोधले जाईल. अशा स्थितीत सोनिया गांधी यांना उत्तर भारतातून राज्यसभेत पाठवले पाहिजे. त्यामुळे त्यांना राजस्थानमधून राज्यसभेचे उमेदवार केले जात आहे.
आपचे उमेदवार जाहीर
राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’मध्ये गुंतलेल्या काँग्रेसला कंटाळून मंगळवारी आपने दक्षिण गोवा तसेच गुजरातमधील दोन उमेदवारांच्या नावांची घोषणा केली.