- शीलेश शर्मानवी दिल्ली : काँग्रेसच्या कार्यशैलीबाबत पक्षातील २३ ज्येष्ठ नेत्यांनी सवाल उपस्थित केल्यानंतर आजवर खूप गदारोळ माजला होता. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या संघटनात्मक बाबींसंदर्भात चर्चा करण्यासाठी त्या पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी शनिवारी एका बैठकीचे आयोजन केले आहे.काँग्रेसमधील खटकणाऱ्या बाबींबद्दल आवाज उठविणाऱ्या २३ नेत्यांपैकी निवडक नेत्यांना या बैठकीला बोलाविले जाणार आहे. त्याशिवाय के. सी. वेणुगोपाल, रणदीप सूरजेवाला यांसह आणखी काही ज्येष्ठ काँग्रेस नेतेही या बैठकीत सामील होणार आहेत. त्यामध्ये पक्षाच्या संघटनात्मक बाबींवर चर्चा होईल.येत्या शनिवारच्या बैठकीत सोनिया गांधी शेतकरी आंदोलन, महागाई, काँग्रेस पक्षातील अंतर्गत स्थिती अशा अनेक विषयांवर चर्चा करतील. त्याशिवाय मोदी सरकारचा मुकाबला करण्यासाठी काय रणनीती आखावी याबद्दलही विचार केला जाईल.पक्ष चालविण्याच्या पद्धतीबाबतही खलकाँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुका फेब्रुवारी महिन्यात घेण्याचा पक्षनेतृत्वाचा विचार आहे. त्यासाठी व पक्ष चालविण्याची पद्धती याबाबत नेत्यांचे विचार सोनिया गांधी शनिवारच्या बैठकीत जाणून घेणार आहेत. पक्ष कार्यकारिणीच्या निवडणुका व्हाव्यात, अशी मागणी नाराज असलेल्या २३ काँग्रेस नेत्यांनी केली होती.
सोनिया गांधी घेणार शनिवारी महत्त्वाची बैठक; ‘त्या’ २३ पैकी निवडक नेतेही हजर राहणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2020 3:27 AM