आदेश रावलनवी दिल्ली :
काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारण्यास राहुल गांधी यांनी नकार दिल्यानंतर पक्षात नवे राजकीय समीकरण उदयास येत आहे. राहुल गांधींना अध्यक्ष व्हायचे नसल्यास सोनिया गांधी यांनीच अध्यक्षपदावर कायम राहावे, असे पक्षातील अनेक ज्येष्ठ नेत्यांचे मत आहे. पक्ष अडचणीत असताना गांधी परिवाराच्या सदस्याने नेतृत्व सोडल्यास पक्ष विखुरला जाऊ शकतो, अशी भीती या नेत्यांना आहे.
काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. राहुल गांधी यांनी अध्यक्षपद स्वीकारावे, अशी इच्छा पक्षातील नेत्यांची होती. मात्र, त्यांनी नकार दिल्यानंतर नव्या अध्यक्षाचा शोध सुरू झाला. गांधी कुटुंबाबाहेरील व्यक्तीला अध्यक्षपद दिले जावे, अशी भूमिका पक्षातील एका गटाने घेतली होती. मात्र, गांधी कुटुंबीयांच्या रणनितीकारांनी त्यांची समजूत काढली. पक्ष सध्या अडचणीत आहे. अशा वेळी गांधी कुटुंबीयाने पक्षनेतृत्व सोडायला नको. अन्यथा पक्ष विखुरला जाईल.
निवडणुकीची तारीख लवकरचकाँग्रेसची समिती लवकरच अध्यक्षपदाच्या निवडणुकीची तारीख जाहीर करणार आहे. २० सप्टेंबरपूर्वी पक्षाचा नवा अध्यक्ष निवडायचा आहे. राहुल गांधी यांनी अध्यक्ष होण्यास नकार दिला असला तरीही ते ७ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या भारत जोडो यात्रेचे नेतृत्व करणार आहेत.
दोन उपाध्यक्षांबाबत विचार सुरूसोनिया गांधी यांच्या नेतृत्वावर ज्येष्ठ किंवा तरुण नेत्यांपैकी कोणालाच आक्षेप नाही. मात्र, त्यांच्या प्रकृतीचा विचार करता दोन उपाध्यक्ष निवडण्याचा विचार पक्षात करण्यात येत आहे. त्यात एक दक्षिण भारतातून तर एक उत्तर भारतातून असावा, असा प्रस्ताव आहे. दक्षिणेकडून मल्लिकार्जुन खर्गे आणि रमेश चेन्नीथला तर उत्तरेकडून अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्या नावांवर चर्चा सुरू आहे.
‘भारत जोडो यात्रे’साठी एकत्र यायेत्या ७ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या काँग्रेसच्या ‘भारत जोडो यात्रे’साठी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी देशातील स्वयंसेवी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना मदतीचे आवाहन केले. स्वयंसेवी संस्थांनी मात्र काँग्रेसला असे कोणतेही आश्वासन तूर्तास दिले नाही.
काँग्रेस पक्षातर्फे येत्या ७ सप्टेंबरपासून कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत भारत जोडो यात्रा काढण्यात येणार आहे. देशाला सध्या भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकारण व जनतेच्या भावना समजून घेण्यासाठी काँग्रेसने ही भारत जोडो यात्रा काढण्याचे ठरविले आहे. या यात्रेत काँग्रेसचे नेते राहुल गांधी स्वत: सहभागी होणार आहेत. देशभर जवळपास ३५०० किलोमीटर फिरणाऱ्या या यात्रेत १५० कार्यकर्ते पूर्णवेळ राहणार आहेत. केंद्रातील सरकार देशात विद्वेष पसरवीत आहे. नोटाबंदीमुळे देशाची अर्थव्यवस्था रसातळाला गेली आहे. बेरोजगारीचा प्रश्न आ वासून उभा आहे. ही स्थिती लोकांना समजावून सांगण्यासाठी भारत जोडो यात्रा काढली जाणार आहे.
या यात्रेत समाजातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संघटनांनी सहभागी व्हावे, यासाठी राहुल गांधी यांनी सोमवारी दिल्लीत बैठक घेतली. या चर्चेनंतर स्वयंसेवी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसला सहभागाचे आश्वासन दिले नाही. परंतु, या यात्रेचे स्वागत करणार असल्याचे योगेंद्र यादव यांनी सांगितले.