काँग्रेसने उदयपूर येथे होणाऱ्या चिंतन शिबिरासाठी मोठी तयारी केली आहे. सध्या काँग्रेसला सातत्याने पराभवाचे तोंड पहावे लागत आहे. अशा स्थितीत काँग्रेस, संघटनेपासून ते नरेटिव्हपर्यंत मोठ्या कायापलटाच्या तयारीत आहे. एवढेच नाही, तर पक्ष सोडून जाणाऱ्या कार्यकर्त्यांना रोखण्यासाठीही पक्ष मोठे प्रयत्न करताना दिसत आहे.
काँग्रेसमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या चिंतन शिबिरात पक्षाच्या नेत्यांना पक्ष न सोडण्याची शपथही दिली जाऊ शकते. निष्ठेची शपथ देताना, त्यांना स्वतःबरोबरच समर्थकांना पक्षाशी जोडून ठेवण्यासंदर्भात वचन देण्यासही सांगण्यात येईल. तत्पूर्वी ज्योतिरादित्य सिंधिया, जितिन प्रसाद यांच्यासह अनेक नेत्यांनी पक्ष सोडला आहे.
सध्या पक्ष सोडून जाणाऱ्या नेत्यांना रोखणे हे काँग्रेस समोरील सर्वात मोठे आव्हान आहे. याच बरोबर, या शिबिरात, पक्षात एक व्यक्तीला केवळ एक पद मिळेल, असा प्रस्तावही मंजूर होऊ शकतो. याच बरोबर, एका कुटुंबात केवळ एका व्यक्तीलाच तिकीट मिळेल, असा फॉर्म्युलाही लागू केला जाऊ शकतो. महत्वाचे म्हणजे हा फॉर्म्युला गांधी कुटुंबासाठीही लागू असेल, अशी चर्चाही आहे. या शिबिरादरम्यान सोनिया गांधी निवडणूक न लढण्याची घोषणाही करू शखतात आणि एकटे राहुल गांधीच 2024 मध्ये निवडणूक लढू शकतात, अशीही चर्चा सुरू आहे. पण, गांधी कुटुंबासाठी हा फॉर्म्युला लागू राहणार नाही, असेही होऊ शकते, असेही काही काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे.
जी-23 नेत्यांना साधण्याचा प्रयत्न - काँग्रेस जी 23 तील प्रभावी नेत्यांना साधण्याचाही प्रयत्न करत आहे. याचाच एक भाग म्हणून हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा यांना शेतकऱ्यांशी संबंधित एका समितीची जबाबदारी देण्यात आली आहे. याशिवाय दलित नेते उदयभान यांनाही प्रदेश अध्यक्ष बनवण्यात आले आहे. या चिंतन शिबिराकडून काँग्रेसला मोठ्या आशा आहेत.