नवी दिल्ली : वाराणसीतील रोड शोदरम्यान प्रकृती बिघडल्यामुळे दिल्लीला परतलेल्या काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची प्रकृती आता स्थिर असून, त्यांना बुधवारी येथील सर गंगाराम रुग्णालयात हलविण्यात आले. प्रचंड ताप असल्यामुळे सोनिया यांना मंगळवारी रात्री उशिरा येथे लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अचानक प्रकृती बिघडल्यामुळे वाराणसी येथील रोड शो अर्धवट सोडून त्या चार्टर्ड विमानाने मध्यरात्री येथे परतल्या. त्यानंतर विमानतळाजवळ असलेल्या लष्करी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. गांधी यांनी यापूर्वी सर गंगाराम रुग्णालयात उपचार घेतले असल्यामुळे त्यांना तेथे हलविण्यात आले, असे सूत्रांनी सांगितले. तत्पूर्वी काँग्रेसच्या मीडिया सेलचे प्रमुख रणदीप सुरजेवाला यांनी सोनिया गांधी यांची प्रकृती स्थिर असून, सुधारत असल्याचे सांगितले होते. वाराणसीतील लोकांना भेटण्यासाठी तसेच काशी विश्वनाथाचे दर्शन घेण्यासाठी परत येईन, असे सोनिया यांनी काल स्वत: म्हटले होते. देशवासीय आणि लाखो काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपल्या प्रकृतीबाबत दाखविलेल्या काळजीने सोनिया गांधी भारावून गेल्या असून, त्यांनी सर्वांचे आभार मानले आहेत, असेही सुरजेवाला म्हणाले. रुग्णालयात राहुल आणि प्रियंका गांधी त्यांच्यासोबत होते. जावई रॉबर्ट वड्रा यांनीही त्यांची भेट घेतली. (लोकमत न्यूज नेटवर्क) >शरीरातील पाणी कमीकाँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या शरीरातील पाणी कमी झाले आहे. तथापि, त्यांची प्रकृती स्थिर आहे, असे गंगाराम रुग्णालयाने बुधवारी सांगितले. रुग्णालयाचे प्रमुख डॉ. डी. एस. राणा यांनी सोनिया गांधी यांच्या प्रकृतीबाबत बुधवारी मेडिकल बुलेटीन जारी केले. या बुलेटीनमध्ये म्हटले आहे, की सोनिया यांच्या शरीरातील पाणी कमी झाले आहे. तथापि, त्यांची प्रकृती स्थिर असून, त्यांना विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे.
सोनिया गांधी यांची प्रकृती स्थिर
By admin | Published: August 04, 2016 5:43 AM