विरोधी आघाडीसाठी सोनिया गांधींचे प्रयत्न, गुलाम नबी आझादही पूर्वीसारखे सक्रिय
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2021 06:06 AM2021-05-14T06:06:06+5:302021-05-14T06:10:06+5:30
सोनिया गांधी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार किंवा माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांना समविचारी पक्षांशी चर्चा करण्याची व संयुक्त पत्र तयार करण्याची विनंती यावेळी केली नव्हती.
हरीश गुप्ता -
नवी दिल्ली : देशभरातील विरोधी पक्षांना एकत्रित करण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आता कंबर कसली आहे. कोरोना साथीमुळे देशात निर्माण झालेल्या विदारक स्थितीबाबत विरोधी पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांची स्वाक्षरी असलेले एक पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बुधवारी पाठविण्यात आले. त्यासाठी या नेत्यांना राजी करण्याचे काम सोनिया गांधी यांनी केले होते. त्यातून भविष्यात घडणाऱ्या राजकीय हालचालींची चुणूक दिसून येते. काँग्रेसमधील नाराज नेते गुलाम नबी आझाद हेही आता पक्षकार्यात पूर्वीसारखे सक्रिय झाल्याचे दिसत असून त्यामागेही सोनिया गांधींचेच प्रयत्न आहेत.
सोनिया गांधी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार किंवा माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांना समविचारी पक्षांशी चर्चा करण्याची व संयुक्त पत्र तयार करण्याची विनंती यावेळी केली नव्हती. त्याऐवजी सोनिया गांधी यांनी काँग्रेस पक्षाचे नेते जयराम रमेश यांना संयुक्त पत्राचा मसुदा तयार करण्यास सांगितले होते. तसेच विरोधी पक्षांच्या नेत्यांबरोबर चर्चा करण्याची जबाबदारी गुलाम नबी आझाद व मल्लिकार्जुन खरगे या काँग्रेस नेत्यांवर सोनिया गांधी यांनी सोपविली होती. खरगे यांनी माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांना संयुक्त पत्रावर स्वाक्षरी करण्याची विनंती केली. काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी द्रमुकचे प्रमुख व तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्यासह काही नेत्यांशी चर्चा केली.
केजरीवाल, पटनायक, मायावतींचा नकार
- या संयुक्त पत्रावर स्वाक्षरी करण्यास दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नकार दिला. मोदी सरकारविरोधातील लढाई केजरीवाल स्वबळावर लढू इच्छितात.
- ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनीही या पत्रावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला. या पत्रावर समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी स्वाक्षरी केली.
- मात्र बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी पत्रावर सही केली नाही. वायएसआर काँग्रेस, तेलंगणा राष्ट्र समिती हे पक्षही या पत्रप्रपंचापासून लांब राहिले.
ममता यांना स्वतःच साधला होता संपर्क
संयुक्त पत्रावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वाक्षरी करावी म्हणून त्यांचे मन वळविण्याकरिता विशेष प्रयत्न करावे लागल्याचे समजते. सोनिया गांधी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी स्वत: संपर्क साधला होता.