एक्झिट पोलवर सोनिया गांधी यांची पहिली प्रतिक्रिया! जाणून घ्या, काय म्हणाल्या?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2024 11:53 AM2024-06-03T11:53:35+5:302024-06-03T11:54:20+5:30
एक तारखेला निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यातील मतदान पार पडले आणि निवडणूक निकालासंदर्भात विविध संस्थांनी आपले एक्झिट पोल जारी केले. यानंतर आता, काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी या एक्झिट पोलवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
लोकसभा निवडणूक 2024 ची रणधुमाळी संपली आहे. एक तारखेला निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यातील मतदान पार पडले आणि निवडणूक निकालासंदर्भात विविध संस्थांनी आपले एक्झिट पोल जारी केले. यानंतर आता, काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी या एक्झिट पोलवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आपल्याला वाट बघावी लागेल, असे त्यांनी म्हटले आहे.
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी म्हणाल्या, ''आपल्याला सध्या वाट बघावी लागेल. आम्हाला पूर्ण आशा आहे की, निकाल एक्झिट पोलच्या अगदी विरुद्ध असतील.'' या शिवाय, आपल्याला जनतेच्या एक्झिट पोलमध्ये 295 जागा मिळाल्या आहेत, असा दावा विरोधी आघाडी I.N.D.I.A. कडून केला जात आहे. एवढेच नाही, तर I.N.D.I.A. च्या बैठकीनंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही याचा पुनरुच्चार केला होता.
महत्वाचे म्हणजे, अधिकांश एक्झिट पोलमध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) पुन्हा एकदा सत्तेवर येत असून विरोधी आघाडी असलेल्या 'I.N.D.I.A.'ला झटका बसत असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. असे असले तरी, मंगळवारी 4 जूनला मतमोजणी होणार आहे. यात देशातील जनतेने नेमका कुणावर विश्वास ठेवला आणि देशाची धुरा कुणाच्या हाती दिली, हे स्पष्ट होईलच.