- इशरत जहाँ प्रकरण
नवी दिल्ली : इशरत जहाँ एन्काउंटर तपास प्रकरणात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी हस्तक्षेप केल्याचा कोणताही पुरावा नाही, अशी माहिती गृहमंत्रालयानेच दिली आहे. माहितीच्या अधिकारांतर्गत विचारण्यात आलेल्या प्रश्नाच्या उत्तरात हा खुलासा झाला आहे. इशरत जहाँ प्रकरणात तत्कालीन सरकारने सादर केलेले शपथपत्र प्रभावित करण्याचा प्रयत्न सोनिया गांधी यांनी केला नाही. तसा कुठलाही पुरावा नाही, असेही गृहमंत्रालयाने स्पष्ट केले आहे. आरटीआय (माहितीचा अधिकार) कार्यकर्त्या तहसीन पूनावाला यांनी माहितीच्या अधिकारात गृहमंत्रालयाकडे २४ एप्रिल रोजी ही माहिती मागविली होती. इशरत जहाँ प्रकरणात भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांच्यावर आरोप केले होते की, त्यांनी या प्रकरणात हस्तक्षेप केला होेता. या पार्श्वभूमीवर तहसीन पूनावाला यांनी ही माहिती मागविली होती. सोनिया गांधी यांनी या प्रकरणात हस्तक्षेप केल्याची काही कागदपत्रे उपलब्ध असतील तर ती द्यावीत, अशी मागणी यात करण्यात आली होती. गृहमंत्रालयाच्या वतीने यावर २३ मे रोजी उत्तर देण्यात आले आहे. उपसचिव एस.के. चिकारा यांनी स्पष्ट केले आहे की, पूनावाला यांनी मागितलेली कुठलीही माहिती या कार्यालयात उपलब्ध नाही. भाजपाने या प्रकरणात सोनिया गांधी आणि पी. चिदंबरम यांच्यावर आरोप केले होते.