नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून असा आग्रह केला आहे की, कोरोनाच्या संकटामुळे बांधकाम क्षेत्रातील मजुरांसाठी काही महत्त्वाचे पावले उचलली जावीत आणि काही आर्थिक मदत त्यांना केली जावी.पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात सोनिया गांधी यांनी म्हटले आहे की, ४.४ कोटी बांधकाम कामगारांना अनिश्चित भविष्याचा सामना करावा लागत आहे. कारण, यातील अनेक जण शहरात फसले आहेत आणि लॉकडाऊनमुळे उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. आम्हाला अशी माहिती मिळाली आहे की, बांधकाम मजुरांसाठीच्या कल्याण बोर्डांनी उपकराच्या माध्यमातून ३१ मार्च २०१९ पर्यंत ४९,६८८ कोटी रुपयांची रक्कम संग्रहित केली आहे. यातील केवळ १९,३८० कोटी रुपयेच खर्च झाले आहेत. देश सध्या कोरोनाचा सामना करीत आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याची गरज आहे. यात आर्थिक घडामोडींवर व्यापक स्वरूपात परिणाम झाला आहे. असंघटित क्षेत्रावर याचा मोठा परिणाम झाला आहे. लाखो कामगार मोठ्या शहरातून आपल्या गावी परतत आहेत. बांधकाम क्षेत्रातील ४.४ कोटी कामगारांचे भविष्य अंधकारमय झाले आहे. उपजीविकेचे संकट उभे ठाकले आहे. कॅनडासारख्या अनेक देशांनी कोरोनासारख्या संकटादरम्यान आर्थिक योजना आखल्या आहेत. येथील परिस्थिती पाहता कामगारांसाठी काही ठोस पावले उचलण्याची आवश्यकता आहे.
Coronavirus : ४.४ कोटी कामगारांना आर्थिक मदत करा, सोनिया गांधी यांचे पंतप्रधान मोदींना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 1:51 AM