हरीश गुप्तानवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पक्षाची घडी व्यवस्थित करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत. निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्यासोबतची चर्चा फिस्कटली असली, तरी मे महिन्याच्या मध्यात उदयपूर येथे होणाऱ्या नव संकल्प चिंतन शिबिरापूर्वीच प्रदेश काँग्रेसमध्ये फेरबदल करण्याचे ठरविले आहे.
२०२० मध्ये नेतृत्वाच्या कार्यशैलीबाबत नाराजी व्यक्त करणाऱ्या असंतुष्ट गटातील नेत्यांना सामावून घेणे, हा कायाकल्पाचा मुख्य घटक आहे. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी विदेश दौऱ्यावर असतानाही सोनिया गांधी चर्चा करून नवीन नियुक्त्या करीत आहेत. स्व. वीरभद्र सिंह यांची पत्नी आणि लोकसभा सदस्य प्रतिभा सिंह यांची त्यांनी मंगळवारी हिमाचल प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली, तर बुधवारी हरयाणा प्र्रदेश काँग्रेस समितीचे नवीन अध्यक्ष म्हणून उदय भान यांची नियुक्ती केली. वर्षअखेर विधानसभेची निवडणूक होत असलेल्या हिमाचल प्रदेशसाठी आनंद शर्मा यांची निवडणूक प्रचार समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संधी मिळताच आनंद शर्मा राज्यसभेवर घेण्यासाठी पक्ष प्रयत्न करील, असेही संकेत आहेत. अलीकडेच आनंद शर्मा यांनी पक्षाध्यक्षांची भेट घेतली होती, तर भूपिंदर सिंह हुडा हेही काही आठवड्यापूर्वी राहुल गांधी यांना भेटले होते. या बैठकीनंतरच कुमारी शैलजा यांनी हरयाणा काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर हुडा यांच्याशी निष्ठावंत असलेले उदय भान यांची प्रदेशाध्यपदी नियुक्ती करण्यात आली.
उदय भान हे माजी आमदार स्व. गया लाल यांचे पुत्र आहेत. त्यांच्यामुळेच ‘आया राम, गया राम’ हा वाक्प्रचार हरयाणात प्रसिद्ध झाला. गया लाल यांनी १९६७ मध्ये एकाच दिवसात तीनवेळा पक्ष बदलले होते. हरयाणा प्रदेश काँग्रेस समितीआधी पंजाब प्रदेश काँग्रेस समितीत फेरबदल करण्यात आले असून, अन्य काही राज्यातील प्रदेशाध्यक्षांंना राजीनामा देण्यास सांगण्यात आले आहे. जम्मू-काश्मीरच्या निवडणुकांचा विचार करून गुलाम नबी आझाद यांनाही महत्त्वाची जबाबदारी दिली येईल.
प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये आले नाहीत कारण...
निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासोबत १० दिवस चर्चा केल्यानंतरही काँग्रेसमध्ये न येण्यामागील कारण महत्वाचे आहे. प्रशांत किशोर यांनी पक्षाच्या महासचिव प्रियांका गांधी यांच्याकडे पक्षाचे अध्यक्षपद द्यावे अशी सूचना केली आणि पक्षांतर्गत सुधारणांसाठी पूर्ण स्वातंत्र्य मला मिळावे, असे त्यांचे म्हणणे होते. परंतु, सोनिया गांधी या राहुल गांधी यांना पक्षाचे अध्यक्ष बनवू इच्छितात. यामुळे प्रशांत किशोर हे पक्षात यायच्या आधीच बाहेर पडले.मंगळवार सकाळपर्यंत सगळे काही व्यवस्थित होते. सोमवारी सोनिया गांधी यांनी राजकीय आव्हानांना तोंड देण्यासाठी ‘एम्पावर्ड ॲक्शन ग्रुप २०२४’ तयार केल्याची घोषणा केली व प्रशांत किशोर यांना या गटात येण्याचे आवाहन केले होते. त्यांनी प्रस्ताव नाकारून म्हटले की,“काँग्रेसला माझी नव्हे तर चांगल्या नेतृत्वाची गरज आणि मोठ्या प्रमाणावर सुधारणांची गरज आहे.” अखिल भारतीय काँग्रेस समितीचे प्रवक्ते रणदीप सूरजेवाला यांनी पक्षाने प्रशांत यांना केलेले आवाहन आणि ते त्यांनी नाकारल्याची माहिती ट्विटरवर दिल्यानंतर तर्कवितर्क सुरू झाले.
मोदींनी बेरोजगारीकडे लक्ष द्यावे - राहुल गांधीकाँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ‘हेट इन इंडिया’ आणि ‘मेक इन इंडिया’ एकत्र नांदू शकत नाहीत, अशा शब्दात बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ट्विटरवर टीका केली आणि मोदींनी देशातील बेरोजगारीकडे लक्ष द्यावे, असे म्हटले. देशातून काही जागतिक दर्जाच्या कंपन्या निघून गेल्याची पार्श्वभूमी या टीकेला आहे. गांधी यांनी देशातील बेरोजगारीचा उल्लेख करून मोदी यांनी हा बेरोजगारीचे महाप्रचंड संकट दूर करण्यावर लक्ष केंद्रित करावे, असे म्हटले. सात जागतिक ब्रँड्स, नऊ कारखाने, ६४९ डीलरशिप्स, ८४ हजार रोजगार भारतातून निघून गेले आहेत, असे गांधी म्हणाले.