नवी दिल्ली : आता बंद पडलेले ‘नॅशनल हेरॉल्ड’ हे वृत्तपत्र प्रकाशित करणाऱ्या कंपनीचे अधिग्रहण करताना लबाडी आणि फसवणूक केल्याच्या फिर्यादीवरून दाखल झालेल्या खटल्यात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधी यांना उद्या मंगळवारी दिल्लीच्या दंडाधिकारी न्यायालयात आरोपी म्हणून हजेरी लावणे अटळ झाले आहे.भाजपा नेते डॉ. सुब्रम्हण्यम स्वामी यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवर महानगर दंडाधिकाऱ्यांनी सोनिया व राहुल गांधी यांच्याखेरीज मोतीलाल व्होरा, आॅस्कर फर्नांडिस, सुमन दुबे, सॅम पित्रोडा व यंग इंडिया लि. या अन्य पाच आरोपींवर उद्या ८ डिसेंबर रोजी न्यायालयात हजर राहण्याचे समन्स गेल्या वर्षी २६ जून रोजी जारी करण्यात आले होते.सोनिया व राहुल गांधींची न्यायालयापुढील हजेरी टाळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात अपील करून मंगळवारी सकाळी स्थगिती घेणे, एवढाच मार्ग शिल्लक आहे. त्यानुसार सर्वोच्च न्यायालयात अपील केले जाईल, असे काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक सिंघवी यांनी सांगितले.1 ‘नॅशनल हेरॉल्ड’ हे दैनिक पं. जवाहरलाल नेहरु यांनी १९३८ मध्ये सुरु केले. कालांतराने ते डबघाईला आले व २००८ मध्ये त्याचे प्रकाशन कायमचे बंद झाले तेव्हा ते चालविणाऱ्या असोशिएडेट जर्नल्स या कंपनीवर ९० कोटी रुपयांचे कर्ज होते. 2 ही कंपनी ज्या़ यंग इंडियन लि. कंपनीने ताब्यात घेतली त्यात सोनिया व राहुल गांधी यांचे आर्थिक हितसंबंध असल्याचा डॉ. स्वामी यांचा दावा आहे. 3 असोशिएटेड जर्नल्सवरील ९० कोटींचे कर्ज यंग इंडियनकडे वर्ग केले गेले. प्रत्यक्षात असोशिएडेड जर्नल्स कंपनीच्या विविध शहरांमधील सुमारे दोन हजार कोटी रुपये किंमतीच्या मालमत्ता ताब्यात घेऊन त्यांचा व्यापारी विकास करण्याच्या हेतूने हा व्यवहार करण्यात आला, असा आरोप आहे.उच्च न्यायालयाच्या या आदेशात अनेक ‘कायदेशीर त्रुटी’ आहेत. हा सोनिया गांधी व राहुल गांधींना जबर हादरा मुळीच नाही. या व्यक्तीनिष्ठ बाबी आहेत. पक्ष केवळ आव्हानच देणार नाही तर सर्वप्रकारच्या कायदेशीर संसाधनांचा व मार्गाचा वापर करेल.-अभिषेक मनु सिंघवी, प्रवक्ते, काँग्रेस———————एवढी मोठी मालमत्ता कवडीमोलाने घेतली की असेच व्हायचे. कायदा त्याचे काम करीत आहे. सामान्य लोक आणि गांधी कुटुंबिय यांना कायदा सारखाच आहे. कायद्यातून ते (गांधी) पळू शकत नाहीत.-शाहनवाज हुसैन, प्रवक्ते, भाजपा
सोनिया, राहुल यांची कोर्टात हजेरी अटळ
By admin | Published: December 08, 2015 2:13 AM