नवी दिल्ली : माझ्या नव्या पुस्तकातील मजकुरावर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी तीव्र प्रतिक्रिया द्यावी यावरूनच माझ्या लिखाणाने त्यांच्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवले गेले आहे व कशाने तरी त्या अस्वस्थ झाल्या आहेत हेच सिद्ध होते, असे माजी काँग्रेस नेते व माजी परराष्ट्रमंत्री के. नटवर सिंग यांनी शुक्रवारी म्हटले.गांधी घराण्याचे एकेकाळचे विश्वासू परंतु संपुआ-१ सरकारमधून वादग्रस्त परिस्थितीत २००८ मध्ये परराष्ट्रमंत्रीपदाचा राजीनामा द्यायला लागल्यापासून संबंध बिघडलेल्या ८३ वर्षांच्या नटवर सिंग यांचे ‘वन लाईफ इज नॉट इनफ’ हे आत्मचरित्रपर पुस्तक शुक्रवारी ग्रंथभांडारांमध्ये उपलब्ध झाले. त्यातील काही अंशांना पूर्वप्रसिद्धी मिळाल्यानंतर नव्या वादास तोंड फुटले होते.या पार्श्वभूमीवर एका वृत्तवाहिनीवरील मुलाखतीत नटवर सिंग यांनी असाही दावा केला की, माझ्या पुस्तकात मी सत्य समोर आणल्याबद्दल ५० काँग्रेसजनांनी फोन करून माझे अभिनंदन केले.२००४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर सोनिया गांधी यांनी आपल्या अंतर्मनाची हाक ऐकून पंतप्रधान होण्यास नकार दिला, अशी वदंता काँग्रेसने पसरविली असली तरी ते खरे नाही. पंतप्रधान झाल्या तर वडील राजीव गांधी व आजी इंदिरा गांधी यांच्याप्रमाणे त्यांचीही हत्या केली जाईल, या भीतीने चिरंजीव राजीव गांधी यांनी हट्टाने गळ घातल्यामुळेच सोनिया गांधी पंतप्रधान पदापासून दूर राहिल्या, असा दावा नटवर सिंग यांनी पुस्तकात केला आहे. यावर तीव्र प्रतिक्रिया देताना सोनिया गांधी गुरुवारी म्हणाल्या होत्या की, मी स्वत:च पुस्तक लिहीन म्हणजे सर्व काही तुम्हाला समजेल....मी लिहिणे हाच सत्य बाहेर येण्याचा मार्ग आहे... मी त्याविषयी गंभीर असून नक्कीच मी पुस्तक लिहीन. या लिखाणाने आपण जराही दुखावलो नसल्याचे आग्रहपूर्वक सांगून सोनियाजी असेही म्हणाल्या होत्या की, पती राजीव गांधी यांची हत्या व सासू इंदिरा गांधी यांची बंदुकीच्या गोळ््यांनी चाळण उडण्यासारख्या याहूनही कितीतरी भयंकर गोष्टी मी आयुष्यात अनुभवल्या आहेत.सोनिया गांधी या प्रतिक्रियेविषयी विचारता वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत नटवर सिंग म्हणाले की, माझ्या पुस्तकावर सोनिया गांधी यांनी प्रतिक्रिया देणे हेच लक्षवेधी आहे, कारण याआधी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे माजी माध्यम सल्लागार संजय बारु यांच्या पुस्तकावर त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. मी त्यांचा सल्लागार असतो तर काहीही न बोलता गप्प बसण्याचा सल्ला मी त्यांना दिला असता, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.सोनिया गांधी यांना आपली मते मांडण्याचा नक्कीच अधिकार आहे. त्यामुळे त्या लवकरच पुस्तक लिहितील, अशी आशा आहे व ते पुस्तक वाचण्याची माझी मनिषा आहे, असेही नटवर सिंग म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
दुख-या नसेवर बोट ठेवले म्हणूनच सोनियाजी अस्वस्थ
By admin | Published: August 02, 2014 3:37 AM