सोनिया गांधी म्हणाल्या-माध्यमांद्वारे बोलू नका, नवज्योतसिंग सिद्धूंनी तेच केलं; पत्र लिहून सोशल मीडियावर केलं पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2021 03:50 PM2021-10-17T15:50:17+5:302021-10-17T15:57:17+5:30
पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनी सोनिया गांधींना 13 मागण्यांबाबत पत्र लिहिलं आहे.
जालंधर: शनिवारी काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षप्रमुख सोनिया गांधींनी दिलेला सल्ला दुसऱ्याच दिवशी कुचकामी ठरला. सोनिया गांधी आपल्या नेत्यांना म्हणाल्या होत्या की, माझ्याशी बोलण्यासाठी माध्यमांचा वापर करु नका, थेट बोला. पण, लगेच रविवारी पंजाबकाँग्रेसचे अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनी सोनिया गांधींना 13 मागण्यांबाबत पत्र लिहिले. विशेष म्हणजे सिद्धूंनी हे पत्र त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केलं आहे.
सोनिया गांधींना पत्र लिहिण्याच्या बहाण्याने सिद्धू यांनी मुख्यमंत्री चरणजीत चन्नी यांच्यावर हल्ला केला आहे. ते म्हणाले की, काँग्रेस हायकमांडने अनुसूचित जातीचे मुख्यमंत्री बनवून पुरोगामी निर्णय घेतला. असे असूनही अनुसूचित जातींना सरकारमध्ये समान प्रतिनिधित्व मिळाले नाही. या पत्रानंतर राजीनामा मागे घेणाऱ्या सिद्धू यांची सरकारविरोधातील बंडखोर वृत्ती आहे तशीच असल्याचे दिसत आहे.
— Navjot Singh Sidhu (@sherryontopp) October 17, 2021
पंजाब सरकारवर दबाव आणण्यासाठी नवीन सूत्र
आता पंजाब सरकारवर दबाव आणण्यासाठी नवज्योत सिद्धू एक नवीन सूत्र घेऊन आले आहेत. सिद्धू यांनी सोनिया गांधींना पत्र लिहून 13 मुद्दे उपस्थित केले आहेत. ज्यामध्ये सोनियांना पंजाब सरकारला या समस्यांचे निराकरण करण्याच्या सूचना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवल्यानंतर सिद्धू सरकारवर दबाव टाकून सुपर सीएम बनण्याचा प्रयत्न करत आहेत. या कारणास्तव, आता त्यांनी हायकमांडच्या माध्यमातून मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे.
आतापर्यंत सिद्धू आपल्याच सरकारशी थेट भिडायचे, पण हायकमांडच्या नाराजीनंतर सिद्धूंनी आपली भूमिका बदलली. सिद्धू यांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वाला अप्रत्यक्षरित्या स्पष्ट केले आहे की, जर त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर कारवाई केली नाही तर पुढील निवडणुकांमध्ये काँग्रेसला त्रास होऊ शकतो. याशिवाय, सिद्धू यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या प्रचारामुळे अनेक जागांवर विजयाचा दावा केला आहे. सिद्धू म्हणाले की, त्यांनी 2017 मध्ये 55 विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रचार केला होता, त्यापैकी काँग्रेसने 53 जागा जिंकल्या.